Sanjay Raut : ‘मुंडे जर काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचा जीव वाचला असता’; संजय राऊत यांचं वक्तव्य
Sanjay Raut : मानसिकदृष्ट्या सतत त्रास दिला जात होता आणि मानसिक आघातही केले जात होते, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ज्याचे पडसाद आता सध्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
या गौप्यस्फोटानंतर भाजप नेत्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मंत्री पंकजा मुंडे प्रतिक्रिया देत आता यावर चर्चा करून काय उपयोग आहे आता ते हयात नाहीत, असे म्हटले होते. “मला जे माझे वडील समजले, ते या कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले, हाच त्यांचा खरा राजकीय प्रवास आहे, अशी प्रतिक्रिया देऊन चर्चांना पूर्णविराम दिला. अशातच आता याबाबत उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठं विधान केले आहे.
ते (गोपीनाथ मुंडे) काँग्रेसमध्ये आले असते तर प्राण वाचले असते, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपमध्ये असताना त्यांना छळ सहन करावा लागला होता. मानसिकदृष्ट्या सतत त्रास दिला जात होता आणि मानसिक आघातही केले जात होते, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“त्यांना मानसिकदृष्ट्या त्रास दिला जात होता. मानसिक आघात केले जात होते. आम्ही दिल्लीत होतो. ते पवारांना भेटले. ते सज्जन गृहस्थ होते. त्यांनी अशाप्रकारच्या पक्षांतराला विरोध केला होता. त्यामुळे त्यांना आहात, तिथे थांबण्यास सांगितलं होतं. काँग्रेसमध्ये आले असते तर प्राण वाचले असते.”
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले होते?
“भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. यासाठी त्यांनी मंत्रिपदाची अट घातली होती. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मुंडे यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला होता. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याला विरोध केला होता. मंत्रिपद मिळाले नाही तर नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत, अशी भूमिका मुंडे यांनी मांडली होती. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या,” असा खळबळजनक दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.





