Mohammed Shami : ‘जर मी दुलीप ट्रॉफी खेळू शकतो, तर टी-20 क्रिकेटही…’, आशिया कपसाठी निवड न झाल्याने शमीचं मोठं वक्तव्य

Mohammed Shami on Team Selection : आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला या संघात स्थान मिळालेले नाही. शमी गेल्या काही काळापासून दुखापती आणि तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे क्रिकेटपासून दूर आहे. 2023 च्या विश्वचषकानंतर त्याला दुखापतीचा सामना करावा लागला आहे. तरीही, तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतीय संघाचा हिस्सा होता आणि लवकरच दलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. याच दरम्यान, आशिया कपसाठी निवड न झाल्याबाबत शमीने मोठे वक्तव्य केले आहे.
आशिया कपमधून वगळल्यावर शमीने सोडले मौन –
मोहम्मद शमीने भारतीय संघासाठी शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये त्याने अखेरचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर त्याने आयपीएलमध्येही सहभाग घेतला होता, पण त्यानंतर तो मैदानापासून दूर आहे. नुकत्याच न्यूज24 शी बोलताना शमीने आशिया कपसाठी भारतीय संघात निवड न झाल्याबाबत स्पष्टपणे भाष्य केले.
मी कोणाला दोष देत नाही किंवा याबाबत तक्रारही करत नाही –
मोहम्मह शमी म्हणाला, “मी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. निवड न झाल्याबाबत मी कोणाला दोष देत नाही किंवा याबाबत तक्रारही करत नाही. जर मी संघासाठी योग्य असेन, तर मला खेळवा; नसेल, तर मला कोणतीही अडचण नाही. निवड समितीची जबाबदारी आहे की त्यांनी भारतीय संघासाठी सर्वोत्तम निर्णय घ्यावा. मला माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे आणि जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा मी माझे सर्वोत्तम देईन. मी सध्या कठोर मेहनत करत आहे. जर मी दुलीप ट्रॉफी खेळू शकतो, तर टी-20 क्रिकेटही नक्कीच खेळू शकतो.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन कधी?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाबाबत बोलताना शमी म्हणाला, “मी कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. जर त्यांनी मला खेळवले, तर मी चांगली कामगिरी करून 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करेन. मला खेळवायचे की नाही, हे माझ्या हातात नाही. जर मी दुलीप ट्रॉफी आणि पाच दिवसीय क्रिकेट खेळू शकतो, तर बाकी कशाचा विचार करायची गरज आहे?” याशिवाय, ब्रोन्को टेस्टबाबत बोलताना शमीने सांगितले, “मला बंगळुरूला बोलावण्यात आले होते. मी ब्रोन्को फिटनेस टेस्ट पास केली आहे आणि आता मी खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.”





