‘तो’ हट्ट सोडल्यास नाशकात स्वागत करू; अन्यथा… OBC समाजाचा जरांगेंना इशारा

नाशिक : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे OBC मधून आरक्षण द्यावे या मुद्द्यावर ठाम आहेत. तर दुसरीकडे OBC समाजाकडून या मागणीला विरोध करण्यात आला आहे. आपल्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे यांनी शांतता रॅली सुरु केली आहे. या शांतता रॅलीचा समारोप 13 ऑगस्टला नाशकात होणार आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी जरांगेना जाहीर इशारा दिला आहे.
काय म्हणाले गजू घोडके?
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सुरुवातीला मराठा आंदोलकांची मागणी होती. नंतर मात्र ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण मिळावे असा हट्ट मनोज जरांगे पाटील यांनी धरल्याने आरक्षणाच्या मुद्द्याला नाहक खतपाणी मिळाले आहे.ओबीसी समाजाला महाकष्टाने आरक्षण मिळाले आहे. त्यासाठी कित्येक वर्षे संघर्ष करावा लागला. परंतु ओबीसींच्या ताटातलेच आरक्षण आम्हाला हवे आणि त्यासाठी दमबाजी, मी याला पाडेल त्याला पाडेल अशा वल्गना करून सवंग प्रसिद्धी मिळवणे कितपत योग्य आहे.
केवळ विशाल मोर्चे काढून आणि दमबाजीचे राजकारण करून आरक्षण मिळत नसते. त्यासाठी कायदेशीर लढाईच आवश्यक असते. ओबीसीतूनच मराठा समाजास आरक्षण देण्याची मागणी खऱ्या ओबीसींवर अन्याय करणारी असल्याने आम्ही ओबीसी बांधव त्याच्या सातत्याने निषेध करीत राहू. ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण मिळावे हा हट्ट त्यांनी सोडल्यास 13 ऑगस्टला त्यांचे नाशकात स्वागतच केले जाईल. मात्र आपल्या हट्टाला ते चिटकून राहिल्यास त्यांना ओबीसींतर्फे काळे झेंडे दाखविले जातील.तसेच त्यादिवशी प्रत्येक ओबीसी बांधव आपल्या घरावर काळी गुढी उभारेल, असा इशारा त्यांनी जरांगेना दिला आहे.





