Eknath Shinde : “दिनो मोरियाने तोंड उघडलं तर… “: एकनाथ शिंदेंचा थेट विधानसभेतून इशारा

Eknath Shinde : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राज्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळत आहे. १६ जुलै या दिवशी विधानपरिषदेचे उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना निरोप देण्यात आला.
यासाठी विधिमंडळाच्या आवारात खास फोटोशूट पार पडले. यानंतर आज पुन्हा सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि विकासकामांबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले काही लोकांनी अर्धवट माहितीच्या आधारे मुद्दे मांडले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही, त्यामुळे कामं होत नाही असं सांगण्यात आलं. मात्र राज्यघटना आपण मानतो आणि त्यानुसार काम करावे लागते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टात असल्याने घेता आल्या नाही, असे शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. याशिवाय मराठीच्या मुद्यावरून त्यांनी ठाकरे बंधूंना टोलाही लगावला. मिठी नदीच्या गाळाचा मुद्दा उपस्थित करत दिनो मोरियाला हे कंत्राट का दिलं, असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.
आत्मपरिक्षण करण्याची गरज
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये मराठी माणसासाठी काय केलं असे म्हणत आरोपांची राळ उठवून दिली. या टीकेला उत्तर देताना मराठी माणसासाठी काय केलं असं म्हणत अनेकजण गळे काढतात, मात्र तो बाहेर का फेकला गेला याचं आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच कोणाच्या काळात हे बाहेर गेले, पत्राचाळीमध्ये कोणी माया गोळा केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : “इथे येऊन चोऱ्या-चपाट्या केल्या तर…” ; व्हिसा नियमांबाबत भारतीयांना अमेरिकेकडून कडक इशारा





