‘काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदासाठी वेगळा चेहरा असेल तर…’ संजय राऊत स्पष्टच बोलले

Vidhansabha Election । लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविकास आघाडीकडून दणका बसला. महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकत महायुतीला धोबीपछाड दिला. सांगलीचे बंडखोर खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा काँग्रेसला पाठिंबा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडीतील खासदारांची संख्या 31 वर पोहोचली.
आता लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात राज्याच्या भावी मुख्यमंत्री नेमका कुठल्या आघाडीच्या होणार यावरून चर्चा रंगली आहे. दोन्ही आघाडीतील पक्षातील नेत्यांकडून अनेक नावांची चर्चा होत आहे. अशातच ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? असणार या प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिल आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाहीच, असे विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. यानंतर नाना पटोलेंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन विचार करण्याची गरज नाही, असे म्हटले. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी वक्तव्य केले.
नेमकं संजय राऊत काय म्हणाले…
‘२०१९ साली उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे मीच म्हणालो होतो. नाना पटोले यांनी केलेले विधान हे बरोबरचं आहे. महाविकासआघाडीचाच मुख्यमंत्री होईल, हे त्यांचे वाक्य बरोबर आहे. पण त्यांच्यासमोर जर काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदासाठीचा वेगळा चेहरा असेल, तर त्यांनी स्पष्टपणे सांगावे. माझी यात काहीही अडचण नाही. काँग्रेसमध्ये जर मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा असेल आणि त्यांनी जर तो सांगितला तर आम्ही त्या चेहऱ्याचे नक्कीच स्वागत करु. नाना पटोले हे आमचे मित्र आहेत. त्यांची अडचण मी समजू शकतो. इतरांचीही अडचण मी समजू शकतो.’ असेही राऊत म्हणाले.





