पुणे | फसवणूक करत असल्यास थेट पोलिसांत जा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सध्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरती पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया आहे. त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षता घेण्यात आलेली आहे, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.
तरीही कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्यात तातडीने फिर्याद दाखल करावी. फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य करू, असेही मांढरे यांनी सांगितले आहे.
शिक्षक भरती ही आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून पात्र अभियोग्यताधारकांना संस्था, जिल्हा परिषदे मधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. मात्र, उमेदवारांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही अनधिकृत दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असून त्यामध्ये हस्तक्षेपाला वाव नाही, असे मांढरे यांनी जाहीर केले आहे. खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांच्या वर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येत आहे, असेही मांढरे यांनी सांगितले आहे.
शिक्षण आयुक्त म्हणाले…
अमुक जिल्हा परिषदेत नोकरी लावून देतो, एखाद्या संस्थेत भरती करून देतो, जवळच्या संस्थेत नोकरी देतो या विविध प्रकारची खोटी आश्वासने देऊन मागील भरतीच्या वेळी काही दलालांनी उमेदवारांची फसवणूक केली आहे. संगणकाद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची फसवणूक करू शकतात. त्या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. काही गैरप्रकार आढळल्यास शिक्षण विभागाला निदर्शनास आणून द्यावेत, असे आवाहन शिक्षण आयुक्तांनी केले आहे.





