“ठाकरेंकडे BMC गेल्यास कुणीतरी ‘खान’ महापौर होईल”, साटम यांच्या विधानाचा रईस शेख यांनी घेतला समाचार

BJP Amit Satam | वरळी येथे भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात आमदार साटम यांनी, ‘शिवसेना ठाकरे गट मुंबई महापालिकेत सत्तेत आल्यास ‘खान’ मुंबईचा महापौर होईल, पण भाजप ते होऊ देणार नाही. मुंबईवर हिरवे संकट आले आहे. मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल,’ अशी टीका केली होती. यावर आता समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांना प्रत्युत्तर दिले.
अमित साटम यांचा समाचार घेताना आमदार रईस शेख म्हणाले, “मुंबईकरांचे प्रेम असलेला, कोणताही मुंबईकर नागरिक मुंबईचा महापौर बनू शकतो. मुंबापुरी शहर काही भाजपची खाजगी जहागीर आहे का? मुंबईकरांनी विश्वास व्यक्त केल्यास कोणत्याही जातीचा, धर्माचा मुंबईकर नागरिक या शहराचा महापौर होईल. मग तो खान, डिसोझा नाही तर खानोलकर असू द्या. बोहरी, पारशी, ख्रिश्चन, मराठी, मुस्लिम कोणीही मुंबईचा महापौर होऊ शकतो.” BJP Amit Satam|
भाजपला मुंबईचा विकास महत्वाचा वाटत नाही – रईस शेख
“भाजपकडे मुंबईच्या विकासाचे काहीच मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे भाजप नेत्यांना निवडणूक काळात धार्मिक तेढ वाढविणाऱ्या मुद्द्यांना हात घालावा लागतो. भाजपला मुंबईचा विकास महत्वाचा वाटत नाही. या देशातील मातीमध्ये आमच्याही पूर्वजांचे रक्त मिसळलेले आहे. राजकीय नेत्यांचा धर्म काय पाहता? विकासात नेत्याने दिलेले योगदान व काम पाहा’, असा टोलाही आमदार रईस शेख यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम यांना लगावला आहे.
“…तर हसन मुश्रीफ यांना मंत्रिपदापासून दूर करा”
दरम्यान, संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं? आरिफ मोहम्मद खानांना पदं कुणी दिली? खानाचा तिकटरा असेल तर हसन मुश्रीफ यांना मंत्रिपदापासून दूर करा. यासारखी अनेक उदाहरणं मला देता येतील. या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडण घडणीत भाजप नव्हता. पण मुस्लिम समाज होता. अमित साटम यांनी याबाबत जरा अभ्यास करावा. मुंबईचा महापौर हा मराठी असेल आणि तो शिवसेनेचा असेल,” असेहीसंजय राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा:





