“आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींच..” मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यासाठी वेळ देत असतात. विरोधकांना हे खटकत त्यांच्या पोटात दुखते. आता अहंकारी लोकांचा अहंकार संपणार असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ‘अबकी बार 400 पार’ या घोषणेची आमचीही जबाबदारी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
नवी मुंबई विमानतळ मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळत विरोधकांवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे म्हणाले, 50 वर्षात जे झाले नाही ते मोदींनी करून दाखवले. आमच्या भारताच्या अर्थ व्यवस्थेला मोदींनी मजबूत केले. करोडो राम भक्तांचे जे स्वप्न होते राम मंदिर झाले पाहिजे ते आज पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मोदींचे मनमोकळेपणा अभिनंदन केले असते, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
आज 22 किलोमीटरचा समुद्री पूल सुरू झाला आणि त्याचा शुभारंभ मोदींनी केला आहे. या सेतूचे भूमिपूजन मोदींनी केले होते आणि शुभारंभ देखील मोदींनी केले आहे. मधल्या काळात कोविड काळ होता. तरी देखील अधिकाऱ्यांनी काम पूर्ण केले. अटल सेतू प्रकल्प गेमचेंजर आहे. अत्याधुनिक यंत्रणा वापरून हा प्रकल्प आपण पूर्ण केला आहे. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण याचा शुभारंभ होणार आहे. लेक लाडकी लखपती याचा आपण शुभारंभ आपण करत आहोत असेही त्यांनी म्हटले.
देशाची काम करण्याची पद्धत बदलली – फडणवीस
अटल सेतूची १९७३ मध्ये संकल्पना मांडली होती. १९८२ मध्ये जेआरडी टाटा कमिटनीने अलाईन्टमेंट केली. परंतु, ४० वर्षांत काहीच झाले नाही. मोदी पंतप्रधान बनले तसा देशाची काम करण्याची पद्धती बदलली आणि मग अनेक गोष्टी वेगाने चालू लागल्या, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदींच्या सरकारने सर्व पर्यावरणीय परवानग्या वेळेत पूर्ण करून दिल्या. काही लोक म्हणत होते ही जागा फ्लेमिंगो सँच्युरी आहे. त्यांचे काय होईल? बीएनएचएसच्या माध्यमातून मेजर्स केले आणि आज आपण पाहत आहोत की फ्लेमिंगोंची संख्या वाढली आहे. या प्रकल्पासाठी एवढं मोठं कर्ज जपानचे सरकार देत होते, राज्याच्या बजेटमध्ये हे घेतले असते तर ग्रामीण भागात हा प्रकल्प करायची ताकद कमी झाली असती. पण सगळ्या प्रथा बाजूला करून एमएमआरडीएला कर्ज द्या, असे निवेदन आम्ही मोदींना दिले. केंद्रीय कॅबिनेटमधून एमएमआरडीएला हे कर्ज उपलब्ध करून दिले. आज हा सेतू पूर्ण होत आहे, असे फडणवीस म्हणाले.





