“कृपया तुम्ही आत येऊ नका, आम्हीही बाहेर येणार नाही’

वाल्हेकरवाडीतील मातोश्री कॉलनीत “सोसायटी लॉकडाऊन’चा आदर्श उपक्रम
पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा 21 दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन होणार असल्याची घोषणा केल्यामुळे करोना व्हायरसच्या थैमानाचे गांभीर्य सर्वांनाच कळून चुकले आहे. सामाजिक अलिप्तता ही या संसर्गापासून वाचण्याची प्रभावी उपाययोजना असल्याचे जाणून घेऊन वाल्हेकरवाडीत “मातोश्री कॉलनी’ सोसायटीने स्वतःहून “सोसायटी लॉकडाऊन’ करून एक आगळावेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवलाय. “कृपया तुम्ही आत येऊ नका, आम्हीही बाहेर येणार नाही’ अशा आशयाची पाटी लावून करोनाशी लढण्यासाठी येथील तरुणाई सज्ज झाली आहे.
वाल्हेकरवाडीतील ऍड. सुनील वाल्हेकर यांची मुले मेघा वाल्हेकर आणि शुभम वाल्हेकर यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला आहे. याबाबत अधिक माहिती देताना मेघा वाल्हेकर म्हणाली की, सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. संसर्गजन्य असलेल्या या आजाराने आपल्या देशात हाहाकार उडू शकतो हे जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी संपूर्ण देश “लॉकडाऊन’ केला आहे. आपणही याचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे. सामाजिक अलिप्तता म्हणजेच घराबाहेर न पडणे आणि लोकांच्या, गर्दीच्या संपर्कात न येणे हा यावरचा प्रभावी उपाय आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या सोसायटीलाच “लॉकडाऊन’ करण्याचे ठरवले.
अर्थात, आम्ही लोकांना अतिशय आपुलकीने आणि समंजसपणे विनंती करो की, “कृपया तुम्ही आत येऊ नका, आम्हीही बाहेर येणार नाही !’
करोनाच्या भयंकर विळख्यातून आपण सर्वांनीच सुखरूप सुटावे, सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर या संकटातून बाहेर पडावे यासाठी धडपडणाऱ्या मेघा वाल्हेकर, शुभम वाल्हेकर, राजू राठोड आणि प्रवीण शिंदे यासारख्या तरुणांचा आदर्श सगळ्यांनीच घेण्यासारखा आहे.
आमचा लढा “करोना’शी!
करोनाविरोधात लढण्यासाठी तुम्ही असे आगळेवेगळे उपक्रम राबवित असाल तर आम्हाला छायाचित्रांसह आमच्या व्हॉटस्ऍप क्रमांकावर जरूर पाठवा.’ आमचा लढा “कोरोना’शी! या सदरात आम्ही तो प्रकाशित करू.





