ICC Women’s ODI Rankings 2024 : हरमनप्रीत कौरनं घेतली मोठी झेप, स्मृती मंधानाही पोहचली टॉप-5 मध्ये…

ICC Women’s ODI Rankings 2024 : आयसीसीने मंगळवारी महिलांची एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर नवव्या स्थानावर पोहोचली आहे. तसेच सलामीची फलंदाज स्मृती मानधना चौथ्या स्थानावर कायम आहे. गोलंदाजीत दीप्ती शर्माच्या देखील क्रमवारीत सुधारणा होताना ती दुसऱ्या स्थानी विराजमान झाली आहे. नुकताच न्यूझीलंडच्या महिला संघाने भारताचा दौरा केला. या कालावधीत, दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली.
हरमनप्रीत कौरने मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 54 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 24 धावा केल्या. यानंतर तीची क्रमवारीत तीन स्थानाची घसरली झाली होती. मात्र, शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तिने 63 चेंडूत 59 धावांची नाबाद खेळी खेळून भारताला विजय मिळवून दिला. या खेळीमुळे ती पुन्हा टॉप-10 मध्ये आली आहे.
🇮🇳 Harmanpreet Kaur returns to the top ten, climbing up three spots! 📈
Smriti Mandhana maintains her fourth spot in the rankings! pic.twitter.com/5FtxDfJGNI
— Women’s CricZone (@WomensCricZone) November 5, 2024
स्मृती मंधानाने तिसऱ्या वनडेत शतक झळकावले होते. तिने 122 चेंडूत 100 धावांची खेळी केली होती त्यामुळे मंधाना महिला वनडे क्रमवारीत टॉप-5 मध्ये कायम आहे. ती 728 गुणांसह चौथ्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडची नताली स्कायव्हर-ब्रंट 760 रेटिंग गुणांसह अव्वल, दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड 756 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आणि श्रीलंकेची चामारी अथापथू 733 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताची यष्टिरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाच्या क्रमवारीत तीन स्थानांनी सुधारणा होऊन 48 व्या स्थानावर पोहचली आहे. तिसऱ्या सामन्यात 86 धावांची दमदार खेळी करणाऱ्या न्यूझीलंडच्या ब्रुक हॅलिडेला देखील क्रमवारीत फायदा झाला आहे. तिची 12 स्थानांनी सुधारणा होऊन ती 24 व्या स्थानी पोहचली आहे.
गोलंदाजी क्रमवारीत दिप्ती दुसऱ्या स्थानी…
गोलंदाजीत भारताची फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मा देखील 703 रेटिंगसह दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तिने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या लढतीत 39 धावांच्या मोबदल्यात 3 बळी टिपले होते. भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंग 36 स्थानावरून 32 व्या स्थानी, सायामा ठाकोर 97 व्या स्थानावरून 77 व्या स्थानी तर प्रिया मिश्रा 89 वरून 83 स्थानी पोहचली आहे.





