ICC T20 Rankings Updates : आयसीसीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी फलंदाजी क्रमवारीत फार मोठे बदल झाले नसले, तरी काही किरकोळ बदल दिसून येत आहेत. सध्या भारतीय संघ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे, तरीही या बदलांचा परिणाम भारतीय खेळाडूंवर झाला आहे. एकीकडे तिलक वर्माला न खेळताही थोडा फायदा झाला आहे, तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवची क्रमवारीत घसरण झाली आहे. ट्रॅव्हिस हेड ८५६ रेटिंगसह अव्वल – आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत सध्या ट्रॅव्हिस हेड ८५६ रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर भारताचा अभिषेक शर्मा असून त्याचे रेटिंग ८२९ आहे. दरम्यान, भारताचाच तिलक वर्मा एका स्थानाच्या प्रगतीसह आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, त्याचे रेटिंग ८०४ आहे. तिलक वर्माला फिल सॉल्टच्या एका स्थानाच्या घसरणीचा फायदा झाला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेतून फिल सॉल्टने माघार घेतल्याने त्याला एका स्थानाचा तोटा झाला असून त्याचे रेटिंग आता ७९१ आहे. सूर्यकुमार यादवची एका स्थानानी घसरण – इंग्लंडचा माजी कर्णधार जोस बटलरला एका स्थानाचा फायदा झाला आहे. त्याने वेस्टइंडीजविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केली होती. आता जोस बटलर ७७२ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, भारताचा सूर्यकुमार यादव एका स्थानाने खाली म्हणजेच सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचे रेटिंग सध्या ७३९ आहे. टॉप १० रँकिंगमध्ये याशिवाय कोणताही बदल झालेला नाही. हेही वाचा – WTC 2025 Final : रबाडाचा भेदक मारा; एकाच षटकात ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज गारद! पाहा VIDEO या टॉप ६ नंतरच्या फलंदाजांबद्दल बोलायचे तर, पथुम निस्सांका ७१४ रेटिंगसह ७ व्या क्रमांकावर आहे, टिम सेफर्ट ७०८ रेटिंगसह ८ व्या क्रमांकावर आहे. कुसल परेरा आणि रीझा हेंड्रिक्स यांचे रेटिंग समान आहे म्हणजेच ६७६. त्यामुळे, हे दोन्ही फलंदाज सध्या आयसीसी टी२० रँकिंगमध्ये संयुक्तपणे ९ व्या क्रमांकावर आहेत. यशस्वी जयस्वाल ६७३ रेटिंगसह ११ व्या क्रमांकावर आहे.