ICC T20 Rankings : फलंदाजी क्रमवारीत सूर्यकुमार यादवची बादशाहत कायम! अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या मात्र ….

Men’s T20I All-Rounder Rankings : आयसीसीने T20 विश्वचषकापूर्वी मंगळवारी ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय T20 संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या ICC च्या T20 अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत सातव्या स्थानावर कायम आहे. टी-20 फॉरमॅटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तो सध्या अव्वल भारतीय आहे.
हार्दिकचे 185 गुण आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉइनिस 204 गुणांसह त्याच्या एका स्थानाने वर असून तो सहाव्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन हे आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल अष्टपैलू खेळाडू आहेत. हसरंगाची क्रमवारीत एका स्थानाने सुधारणा झाली असून 228 गुणांसह तो अव्वल स्थानावर आहे. शाकिबचेही असेच रेटिंग गुण आहेत.
त्याच्यानंतर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी (218) तिसऱ्या आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (210) चौथ्या क्रमांकावर आहे. रझा याच्या क्रमवारीत दोन स्थानांनी सुधारणा झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा T20 कर्णधार एडन मार्करम (205) देखील पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला.
T20 फलंदाजांची क्रमवारी…
टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा सूर्यकुमार यादव 861 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे, तर इंग्लंडचा फिल सॉल्ट 802 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (781), बाबर आझम (761) आणि मार्कराम (755) यांचा क्रमांक लागतो. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल 714 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
T20 गोलंदाजांची क्रमवारी…
टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद (726 गुण) अव्वल स्थानावर आहे. हसरंगा (687) दुसऱ्या स्थानावर तर वेस्ट इंडिजचा अकील हुसेन (664) तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा अक्षर पटेल (660) चौथ्या स्थानावर आहे. त्याचवेळी श्रीलंकेचा महेश तिक्षाना 659 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.





