Ajit Pawar legacy in sports beyond politics : महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार म्हणजे कडक शिस्त, प्रशासनावरची जबरदस्त पकड आणि थेट निर्णय घेणारा नेता. मात्र, या वलयाच्या पलीकडे त्यांचे एक अत्यंत जवळचे आणि जिव्हाळ्याचे नाते होते, ते म्हणजे ‘क्रीडा क्षेत्राशी’. खेळाडू किंवा प्रशिक्षक नसूनही राज्यातील मैदानांपासून ते आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलांपर्यंत अजितदादांच्या दूरदृष्टीची मोहोर उमटलेली पाहायला मिळते. ‘खेळ म्हणजे केवळ छंद नाही, तर शिस्त’ बारामतीच्या मातीत कुस्ती, कबड्डी आणि ॲथलेटिक्सचे संस्कार घेतलेल्या अजितदादांची क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे व्यावसायिक होती. “खेळ हा केवळ विरंगुळा नसून तो मानवी आयुष्यात शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण करतो,” असे ते नेहमी सांगत. सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांच्या प्रत्येक नियोजनात क्रीडा विकासाचा मुद्दा अजेंड्यावर असायचाच. प्रशासकीय ‘ड्रायव्हिंग सीट’वरून मैदानाचा विकास – पुण्यातील एका क्रीडा संकुलाचा किस्सा आजही अधिकारी आवर्जून सांगतात. कामात होणारा विलंब पाहून दादांनी थेट विचारले होते, “मैदानावर मुले कधी उतरणार?” समाधानकारक उत्तर न मिळाल्यावर त्यांनी तीन महिन्यांची डेडलाईन दिली आणि बजावले, “खेळाडूंच्या पायाखालची माती सरकारी प्रक्रियेमुळे थंड पडता कामा नये.” ही त्यांची तळमळ क्रीडा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारी ठरली. अजित पवारांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान ग्रामीण खेळांना दिले ‘ग्लोबल’ व्यासपीठ पारंपरिक खेळांची पाठराखण: कबड्डी, कुस्ती आणि मल्लखांब हे खेळ आपली खरी ओळख असल्याचे सांगत त्यांनी ग्रामीण स्पर्धांना सरकारी मान्यता आणि पुरस्कार मिळवून दिले. क्रिकेटमधील व्यवस्थापन: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि स्टेडियम विकासात त्यांनी ‘मॅनेजमेंट’ संस्कृती आणली. केवळ मुंबई-पुण्यापुरते मर्यादित न ठेवता विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही क्रिकेटच्या दर्जेदार सुविधा पोहोचवल्या. ‘खेळाडूला पक्ष नसतो, त्याला फक्त संधी हवी’ राजकारणात कितीही मतभेद असले, तरी खेळाडूंच्या बाबतीत दादांनी कधीही राजकारण केले नाही. “खेळाडूला पक्ष नसतो, त्याला संधीची गरज असते,” हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंचा प्रवासखर्च असो किंवा दुखापतीनंतर उपचारांसाठी लागणारा निधी, अजितदादांनी कागदी घोडे न नाचवता काही मिनिटांत निर्णय घेऊन खेळाडूंना आधार दिला. हेही वाचा – Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरसह ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली मैदान, खेळाडू आणि व्यवस्थापनाची सांगड – अजित पवारांनी क्रीडा क्षेत्राकडे केवळ ‘उद्घाटक’ म्हणून पाहिले नाही, तर त्यांनी मैदान, खेळाडू आणि आधुनिक व्यवस्थापन यांना एकत्र बांधले. तयारी आणि निकाल या दोन्ही गोष्टींना ते सारखेच महत्त्व देत. राजकारणाच्या मैदानावर कठोर वाटणारे दादा खेळाडूंच्या प्रश्नावर नेहमीच हळवे आणि संवेदनशील प्रशासक म्हणून समोर आले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या क्रीडा क्रांतीचा एक भक्कम आधारस्तंभ कोसळला आहे.