ICC Ranking (November 2024) : वनडे क्रमवारीत पाकिस्तानी खेळाडूंचा दबदबा, गोलंदाजीसह फलंदाजीतील अव्वल स्थानांवर केला कब्जा…

ICC Ranking (November 2024) : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तुफानी गोलंदाजी करणारा पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज वनडे क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. ताज्या आयसीसी क्रमवारीत शाहीन वनडेमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
शाहीन आफ्रिदीने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शानदार गोलंदाजी केली. पाकिस्तानने ही मालिका 2-1 ने जिंकली. 22 वर्षांनंतर पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियात वनडे मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. या विजयात शाहीन आफ्रिदीचीही महत्त्वाची भूमिका होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शाहीन आफ्रिदी हा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शाहीनने तीन सामन्यांत 12.62 च्या सरासरीने आठ विकेट्स घेतल्या होत्या. या मालिकेत हरिस रौफने सर्वाधिक 10 विकेट घेतल्या.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत शाहीन आफ्रिदीने तीन स्थानांची झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग आता 696 झाले आहे, जे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम आहे. आफ्रिदीची सुधारणा क्रमवारीत फेरबदलाचा एक भाग म्हणून झाली आहे, दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज दोन स्थानानी घसरून 674 स्थानांसह तिसऱ्या स्थानावर आला आहे तर अफगाणिस्तानचा रशीद खान 687 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. ॲडम झाम्पा चौथ्या स्थानावरून 9व्या स्थानावर घसरला आहे तर जोश हेझलवूड तीन स्थानांनी घसरून 10व्या स्थानावर आला आहे.
बुमराहला न खेळता झाला फायदा…
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत जसप्रीत बुमराहलाही फायदा झाला आहे. मात्र, तो बऱ्याच दिवसांपासून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. बुमराह न खेळता (645 रेटिंग) आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आला आहे. त्याचबरोबर भारताच्या मोहम्मद सिराजनेही ताज्या क्रमवारीत प्रगती केली आहे. त्यानेही दोन स्थानांनी झेप घेत सातव्या स्थानावर (643 रेटिंग) झेप घेतली आहे.
फलंदाजी क्रमवारीत बाबर अव्वलस्थानी कायम…
बाबर आझम आयसीसी वनडे फलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रेलियात त्याच्या बॅटमधून धावा झाल्या आहेत. बाबर 825 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानचा नवा कर्णधार मोहम्मद रिझवान दोन स्थानांनी प्रगती करत 23व्या स्थानावर पोहोचला आहे. अव्वल 5 फलंदाजांमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा 765 गुणांसह दुसऱ्या स्थानावर, शुभमन गिल 763 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आणि विराट कोहली 746 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. टाॅप-5 भारताचे तीन फलंदाज आहेत.
अष्टपैलूमध्ये नबी आघाडीवर..
एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अफगाणिस्तानचा अनुभवी फिरकी अष्टपैलू मोहम्मद नबी आघाडीवर आहे. त्याचे 318 रेटिंग गुण आहेत. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर भारताकडे सध्या रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्यासारखे जागतिक दर्जाचे अष्टपैलू खेळाडू आहेत, पण टॉप 10 मध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. रवींद्र जडेजा 14व्या तर हार्दिक पांड्या 22 व्या स्थानावर आहे. 50 हून अधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारा अक्षर पटेल 61 व्या स्थानावर आहे.



