ICC Ranking : सूर्याला मागे टाकत अभिषेक शर्माने ICC क्रमवारीत घेतली मोठी झेप

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेत टीम इंडियाने 4-1 ने विजय मिळवून ही मालिका आपल्या खिशात घातली. या मालिकेत एका युवा खेळाडूच्या खेळीने सगळ्यांना प्रभावित केले. हा खेळाडू दुसरा – तिसरा कोणी नसून अभिषेक शर्मा आहे. त्याच्या या कामगिरीचे त्याला फळ मिळाले आहे. ICC कडून नुकतीच क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
पाचव्या टी-ट्वेंटी सामन्यात अभिषेकने 37 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारतीय संघासाठी दुसरं सर्वात जलद शतक झळकावलं. अभिषेकने 135 धावा करत इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः झोडपून काढले. एका इनिंगमध्ये टी-20 इतिहासात भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने इंग्लड विरुद्ध 54 चेंडूत 7 चौकार आणि 13 सिक्सच्या मदतीने 135 धावा केल्या.
क्रमवारीत मोठी झेप
मागील आठवड्यात अभिषेक शर्मा आयसीसी टी-20 क्रमवारीत 40 व्या स्थानावर होता. त्यानंतर आता अभिषेक शर्माने मोठी झेप घेतली आहे. अभिषेक शर्माने भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला मागे टाकत सऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अभिषेक शर्माने आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर 829 रेटिंग मिळवलं आहे. अभिषेक शर्माने तब्बल 38 रँकिंगने झेप घेतली आहे.
या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड अव्वल स्थानावर कायम आहे. तर टीम इंडियाचा स्टार खेळाडू तिलक वर्मा या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. तिलक वर्माकडे 803 रेटिंग्स आहेत. चौथ्या स्थानी इंग्लडचा फिल सॉल्ट आहे. एवढंच नाही तर टीम इंडियाचा टी-ट्वेंटी कॅप्टन सूर्यकुमार यादव या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. सूर्याकडे 738 रेटिंग्स पॉईंट आहेत.





