Icc Champions Trophy : टीम इंडियाच्या ‘या’ सदस्याला मातृशोक; तातडीने मायदेशी रवाना

टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत सलग 2 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज टीम इंडियाचा न्यूझीलंड सोबत साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळवला जात आहे. यादरम्यान टीम इंडियाच्या गोटातून एक दुःखद बातमी समोर आली आहे.
टीम इंडियातील महत्त्वाच्या सदस्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या सदस्याच्या आईचं निधन झालं आहे. त्यामुळे टीम इंडियातील ही व्यक्ती स्पर्धेदरम्यान मायदेशी परतली आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने याची माहिती दिली आहे. टीम इंडियाचे व्यवस्थापक आर देवराज यांच्या आईचं निधन झालं आहे. देवराज हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत. आईच्या निधनामुळे आर देवराज हैदराबादमध्ये परतले आहेत. आता आर देवराज पुन्हा दुबईत जाणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे.
एचसीएकडून शोक व्यक्त
“कळवताना दु:ख होत आहे की आमचे सचिव आर देवराज यांच्या मातोश्री कमलेश्वरी गारु यांचे निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. आर देवराज यांच्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत”, अशा शब्दात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडून शोक व्यक्त करण्यात आला.





