IAS Tukaram Mundhe : महाराष्ट्रातील शिस्तप्रिय आणि धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांच्या मातोश्री आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यात निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव बीड जिल्ह्यातील मूळ गाव ताडसोन्ना येथे आणण्यात आले आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर मुंढे (IAS Tukaram Mundhe) परिवाराने पारंपरिक रूढींना छेद देत एक अनोखा आणि पर्यावरणपूरक निर्णय घेतला. आसराबाईंच्या अस्थींचे पाण्यात विसर्जन करण्याऐवजी घरासमोरील अंगणात वृक्षारोपण करून त्या ठिकाणी अस्थिविसर्जन करण्यात आले. यावेळी विशेषतः वडाचे झाड लावण्यात आले. IAS Tukaram Mundhe तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांनी याबाबत सांगितले, “पर्यावरणाला कोणतीही हानी न होता आईच्या स्मृती आयुष्यभर स्मरणात राहाव्यात, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आईच्या स्मृतीरूपाने हे झाड सदैव हिरवेगार राहील आणि त्यामुळे तिची आठवण कायम राहील.” आईच्या शिकवणुकीचा वारसा तुकाराम मुंढे यांनी यावेळी आईच्या आठवणींनाही उजाळा दिला. ते म्हणाले, “माझे IAS सिलेक्शन झाल्यानंतर आईने मला एकच सल्ला दिला होता. जेवढ्या जास्तीत जास्त लोकांचे भले करता येईल तेवढे भले करा. आजवर मी त्याच मार्गावर चालत आलो आहे आणि पुढेही त्याच मार्गावर चालणार आहे.” या वेळी तुकाराम मुंढे यांचे भाऊ, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे हे देखील उपस्थित होते. प्रशासनात कडक शिस्त आणि नियमबद्ध कामकाजासाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांचे एक हळवे रूप या वेळी सर्वांनी पाहिले. आईच्या पार्थिवासमोर जाताच त्यांचा अश्रूंचा बांध फुटला आणि ते भावाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले. भ्रष्टाचाराविरोधात थरथर कापणाऱ्या अधिकाऱ्याला आईच्या निधनाने लहान मुलाप्रमाणे व्याकुळ झालेला पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. आसराबाई मुंढे यांच्या निधनाचे वृत्त समजताच ताडसोन्ना गावासह संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त झाली. अंत्यसंस्काराच्या वेळी ग्रामस्थ, नातेवाईक, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुटुंबीयांना सांत्वन देताना सर्वांचे डोळे भरले होते.