आयुक्तांचा सरकारी बसमधून प्रवास; 27 कर्मचाऱ्यांना गमवाव्या लागल्या नोकऱ्या, परिवहन विभागात खळबळ

लखनऊ – परिवहन विभागाची कामगीरी पाहण्यासाठी आयुक्तांनी चक्क सरकारी बसमधूनच प्रवास केला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरचे आयुक्त डॉ. राजशेखर असे या आयुक्तांचे नाव असून त्यांचा बसमधून प्रवास करण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल चांगलाच व्हायरल झाला आहे.
आयुक्त डॉ. राजशेखर यांच्या बस प्रवासानंतर परिवहन विभागात खळबळ उडाली आहे. बस प्रवासात सामान्य प्रवाशांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी हा प्रवास केला आहे. यांच्यासोबतच जिल्ह्यातील आणखी ७ अधिकाऱ्यांनीदेखील सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे प्रवास केला.
या प्रवासादरम्यान आयुक्तांना अनेक अपहार दिसून आले आहेत. यामध्ये वाहक काही प्रवाशांकडून पैसे घेतात. मात्र त्यांना तिकीट देत नसल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर तातडीने १३ बस चालकांना निलंबित करण्यात आले. १४ चालकांची सेवा संपवण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.
अनेक बसेसची देखभाल नीट होत नसल्याची बाब आयुक्तांच्या लक्षात आली. त्यानंतर एआरएमला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. बसेसच्या देखभाल दुरुस्तीचं काम करणाऱ्या खासगी एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याची तयारी सुरू झाली आहे. सध्या या एजन्सीलादेखील कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे.





