शासकीय गाडीवर कोणत्या दिव्याचा वापर कोणते अधिकारी करू शकतात? काय आहेत नियम?

सध्या महाराष्ट्रात IAS पूजा खेडकर हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आहेत. यांच्याबाबत जे वाद समोर आलेत, त्यातही असाच एक गाडीवरील दिव्याचा वाद आहे. त्यांनी त्यांच्या खासगी महागड्या गाडीवर दिवा लावल्याचा हा वाद आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्यासह बडे सरकारी अधिकारी, पोलीस, न्यायाधीश अशा प्रशासनातील मोठ्या हुद्द्यांवरील अधिकाऱ्यांच्या गाडीवर वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आपल्याला पाहायला मिळतात.
2017 मध्ये केंद्र सरकारनं एक नियम करत व्हीआयपी कल्चर संपवलं आणि मंत्री, नेते यांच्या गाडीवर दिवे वापरण्याच्या परंपरेला छेद दिला होता. दरम्यान, ज्यांना गरज आणि अधिकार आहे, त्यांच्याही वाहनांवर कोणत्या प्रकारचे दिवे असावेत याबाबतचेही काही नियम आहेत. ते नियम नेमके काय आहेत? कोणत्या दिव्याचा वापर कोणते अधिकारी करू शकतात? हे आपण जाणून घेऊयात.
लाल दिवा – फ्लॅशरविना आणि गोल न फिरणारा
विधान परिषदेचे उपसभापती
विधान सभेचे उपाध्यक्ष
सर्व राज्यमंत्री
राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष
मुख्य सचिव
महाधिवक्ता
राज्य निवडणूक आयोग आयुक्त
लोकायुक्त
उपलोकायुक्त
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे अध्यक्ष
राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष
वैधानिक विकास मंडळांचे अध्यक्ष
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष
मुख्य माहिती आयुक्त या व्यक्तींच्या शासकीय वाहनावर फ्लॅशरविना (गोल न फिरणारा) लाल दिवा वापरता येतो.
अंबर दिवा – फ्लॅशरविना, गोल न फिरणारा
खालील व्यक्ती त्यांच्या शासकीय वाहनावर, फ्लॅशरविना आणि गोल न फिरणारा अंबर (केशरी रंगाचा) दिवा वापरू शकतात.
प्रधान सचिव
अपर मुख्य सचिव
सचिव
अपर मुख्य सचिव पदाला समकक्ष अधिकारी
पोलीस महासंचालक
महासंचालक पदाला समकक्ष अधिकारी
जिल्हा परिषद अध्यक्ष
‘अ’ आणि ‘ब’ वर्ग महानगरपालिकांचे महापौर तसंच प्रधान मुख्य वनसंरक्षक, विभागीय आयुक्त, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग महानगरपालिकांचे आयुक्त यांनाही हा दिवा वापरता येतो.
निळा दिवा – फ्लॅशरविना गोल न फिरणारा
जिल्हाधिकारी
उपविभागीय दंडाधिकारी
तालुका दंडाधिकारी/तहसीलदार
या अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावर आणि पोलिसांच्या वाहनांवर फ्लॅशरविना गोल न फिरणारा निळा दिवा असेल.
जांभळी काच आणि आत लाल चमकणारा, चालू-बंद होणारा दिवा
रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहने यांना अशा प्रकारचा जांभळी काच असलेला आणि आणि आत लाल चमकणारा तसंच चालू-बंद होणारा दिवा वापरण्याची परवानगी असेल.
अंबर दिवा – फ्लॅशरसह, स्थिर सुरू राहणारा निळा-लाल किंवा निळा-पांढरा एकत्रित विविध रंगाचा दिवा अति महत्वाच्या व्यक्ती (व्हीआयपी)साठीची शासकीय वाहने, अति महत्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) ताफ्यातील शासकीय वाहने अशा प्रकारचा दिवा वापरू शकतील.





