Haryana Secretariat: IAS अधिकाऱ्याच्या स्पेशल सेक्रेटरीची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, कारण काय?
Haryana Secretariat: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चंदीगड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Haryana Secretariat: हरियाणा सचिवालयामध्ये बुधवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. आयएएस (IAS) अधिकारी हितेश कुमार मीणा यांचे स्पेशल सीनियर सेक्रेटरी गणेश दास अरोडा यांनी सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक अंदाजानुसार बदली आणि अंतर्गत पोस्टिंगच्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते.
नक्की काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश दास अरोडा हे बुधवारी नेहमीप्रमाणे कार्यालयात कामावर आले होते. दुपारी १२:३० च्या सुमारास ते कोणालाही काहीही न सांगता कार्यालयातून बाहेर पडले आणि सहाव्या मजल्यावरील गॅलरीतून त्यांनी खाली उडी घेतली. जमिनीवर कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने सेक्टर-१६ येथील नागरी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
१५ दिवसांपूर्वीही केला होता प्रयत्न –
अरोडा हे गेल्या काही काळापासून मानसिक तणावाखाली होते असे समजते. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला होता. बुधवारी सकाळी देखील त्यांनी आपल्या पोस्टिंगबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ते पुन्हा गॅलरीत गेले असता एका कर्मचाऱ्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी टोकाचे पाऊल उचललेच.
हेही वाचा – मोठा घोटाळा! सातारा जिल्ह्यातील भाजप नेत्याला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
तणावाचे कारण काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरोडा हे त्यांच्या ‘इंटरनल पोस्टिंग’मुळे (अंतर्गत बदली) नाराज होते. या संदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केल्या होत्या. याच वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक असतानाच त्यांनी हे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांची पत्नी राजभवनात (गव्हर्नर हाऊस) कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस तपास सुरू –
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चंदीगड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
“आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून पोस्टिंगचा वाद किंवा अन्य काही वैयक्तिक कारणे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.





