Exercise Red Flag 2024 : रेड फ्लॅग हवाई युद्ध सरावात भारतीय हवाई दलानेही नोंदवला सहभाग….

अलास्का (अमेरिका) – अमेरिकेच्या हवाई दलाच्या अलास्का इथल्या आइल्सन हवाई तळावर नुकताच रेड फ्लॅग २०२४ हा विविध देशांच्या हवाई दलांचा सहभाग असलेला हवाई युद्ध सराव झाला. दिनांक ४ जूनला सुरू झालेल्या या सरावाचा समारोप १४ जून रोजी झाला. या सरावात भारतीय हवाई दलाच्या तुकडीने देखील भाग घेतला होता.
एक्स रेड फ्लॅग २०२४ चे हे दुसरे पर्व होते. अमेरिकी हवाई दलाच्या वतीने वर्षातून चार वेळा हा सराव आयोजित केला जातो. या सरावात भारतीय हवाई दलासह सिंगापूर, ब्रिटन, नेदरलँड, जर्मनी आणि अमेरिकेच्या हवाई दलांचे ताफे सहभागी झाले होते. या सरावात भारतीय हवाई दलाच्या तुकडीत राफेल विमानांच्या ताफ्यासह हवाई कर्मचाऱ्यांचे पथक, तंत्रज्ञ, अभियंते, नियंत्रक आणि हवाई दलाशी संबंधित विषय तज्ञांचा समावेश होता.
या युद्ध सरावात राफेल विमानांचा हा पहिलाच सहभाग होता. यावेळी या विमानांनी सिंगापूर तसेच अमेरिकी हवाई दलांच्या एफ -16 आणि एफ -15 तसेच अमेरिकी हवाई दलाच्या ए -10 या लढाऊ विमांनांसोबत उड्डाण करत युद्ध सराव केला. या सरावाच्या काळातली हवामानविषयक परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक होती, शिवाय बहुतांश काळ तापमानाचा पारा जवळपास शून्यापेक्षा खाली गेलेला होता. अशा स्थितीतही भारतीय हवाई दलाच्या देखभाल पथकाने परिश्रमपूर्वक आपली जबाबदारी चोख पार पाडल्यामुळे सरावाच्या संपूर्ण कालावधीत १०० पेक्षा जास्त उड्डाणे करणे शक्य झाले.
तरंग शक्ती २०२४ च्या आयोजनासाठी सज्ज…
एक्स रेड फ्लॅग या हवाई युद्ध सरावादरम्यान मिळालेल्या समृद्ध अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आता, भारतीय हवाई दलही एक्स – तरंग शक्ती – २०२४ या हवाई युद्ध सरावाचे आयोजन आणि त्यात सहभागी होत असलेल्या इतर देशांच्या हवाई दलांच्या तुकड्यांचे यजमानपद भूषवण्यासाठी सज्ज झाला आहे. एक्स – तरंग शक्ती – २०२४ हा हवाई युद्ध सराव भारताच्या वतीने आयोजित पहिला बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव असणार आहे. चालू वर्षाच्या अखेरीला हा हवाई युद्ध सराव आयोजित केला जाणार आहे.



