IAF chopper crash: ग्रुप कॅप्टन वरुणसिंह यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

भोपाळ – तामिळनाडूत लष्करी हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात मरण पावलेले हवाईदलाचे ग्रुप कॅप्टन वरुणसिंह यांच्या मृतदेहावर आज येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बैरागड स्मशानभूमीत त्यांच्यावर हे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी फुलाने सजवलेल्या लष्करी ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
अंत्यसंस्काराच्यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग हेही उपस्थित होते. वरुणसिंह यांच्या मुलाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. वरुण सिंह यांचे वडील कर्नल के. पी. सिंह, वरुणसिंह यांच्या पत्नी आणि मुलगीही यावेळी उपस्थित होते.
तामिळनाडूत 8 डिसेंबर रोजी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत ते गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी बराच काळ मृत्यूशी झुंज दिली; पण अखेर त्यांच्यावर काळाने घाला घातला. याच हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचाही मृत्यू झाला होता.





