Crime News : मध्य प्रदेशातील भोपाळ येथे महाराष्ट्रातील तरुणीसोबत अतिशय भयंकर घटना घडली. भोपाळच्या निशातपुरा परिसरातील एका रिकाम्या प्लॉटमध्ये बांधलेल्या सेप्टिक टँकमधून गुरुवारी 33 वर्षीय तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. या धक्कादायक घटनेचा पोलिसांनी केवळ 24 तासांत उलगडा केला. या घटनेमागे प्रेम, विश्वासघात, ब्लॅकमेल आणि हत्या अशी गुंतागुंतीची कहाणी असल्याचे समजते. अशरफी उर्फ सिया असे तिचे नाव होते. ती मूळची महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील होती. प्राथमिक तपासानुसार, सियाची हत्या सोमवारी ( 9 फेब्रुवारी) तिचा विवाहित प्रियकर समीरने केली. या गुन्ह्यात त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांची मदत घेतल्याचा आरोप आहे. समीरने गळा दाबून सियाची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह लोखंडी पेटीत भरून कमला नगर येथील त्यांच्या घराजवळील सेप्टिक टँकमध्ये टाकला. गुरुवारी (12 फेब्रुवारी) संध्याकाळच्या सुमारास खेळणाऱ्या मुलांना टँकमधून दुर्गंध येऊ लागला. ही गोष्ट त्यांनी घरच्या मंडळींना सांगितली. पाहणी करताना टँकमध्ये लोखंडी पेटी तरंगताना दिसली. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता पेटीत सियाचा कुजलेला मृतदेह आढळला. मृतदेह इतका कुजलेला होता की शरीरावरील जखमा स्पष्ट दिसत नव्हत्या. पण तिच्या हातावरील दीपक नावाचा टॅटू आणि जन्मतारखेच्या आधारे तिची ओळख पटली. निशातपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज पटवा यांनी सांगितले की, मृतदेह तीन ते चार दिवस जुना असावा. प्राथमिक तपासात गळा दाबून हत्या केल्याचा संशय आहे. आरोपी समीर सध्या फरार असून पोलिसांनी त्याचा भाऊ, आई आणि बहिणीला अटक केली. समीरच्या पत्नीचीही चौकशी केली जाणार आहे. पोलीस सूत्रांनुसार, सियाचे यापूर्वी महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये तीन वेळा लग्न झाले होते. फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.