‘मी आता तरूण राहीलो नसल्याची मला कल्पना’; अध्यक्षीय चर्चेतील खराब कामगिरीनंतर बायडेन यांची टिप्पणी

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांचे प्रतिसपर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीच्या संदर्भातील पहिली डिबेट झाली. यात अमेरिकेची अर्थव्यवस्था, अमेरिकेची सीमा, परराष्ट्र धोरण, गर्भपात, राष्ट्रीय सुरक्षा धोरण आदी विषयांवर जोरदार वाद झाला.
यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्परांवर खोटारडेपणाचा आणि अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचे सगळ्यांत वाईट अध्यक्ष ठरल्याचा आरोप केला. या डिबेटनंतर बायडेन काहीसे थकलेले दिसून आले. मात्र तरीही नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव करायचा असल्याचा आपला इरादा त्यांनी स्पष्ट केला.
डिबेटमध्ये झालेल्या दुबळ्या कामगिरीनंतर त्यांनी आपल्या विजयासाठी लढणार असल्याचे सांगितले. मात्र आपण निवडणूक स्पर्धेतून माघार घेत असल्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. डिबेटनंतर झालेल्या एका मेळाव्यात अत्यंंत उत्साहात बोलताना बायडेन म्हणाले मी आता तरूण राहीलेलो नाही हे स्पष्ट आहे व मला त्याची कल्पना आहे.
मी पूर्वीसारखे सहजपणे चालू शकत नाही, सहजपणे बोलत नाही तसेच पूर्वीसारखी चांगली चर्चा करू शकत नाही. मात्र मला मी हे काम करू शकत नाही असा पूर्ण विश्वास असता तर मी निवडणूक लढलोच नसतो. बायडेन बोलताना जमाव त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होता.
दरम्यान, काल झालेल्या डिबेटमध्ये बायडेन धास्तावल्यासारखे दिसत होते आणि बोलतानाही अडखळत होते. काही वेळा ते नेमके काय म्हणत आहेत तेही स्पष्ट ऐकू येत नव्हते. त्यामुळे अमेरिकेतील मतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळेच चार वर्षांची आणखी एक टर्म पूर्ण करण्यास बायडेन तंदुरूस्त नाहीत अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
त्यांच्याच काही सहकाऱ्यांनी त्यांना ते अध्यक्षपदाची आणखी एक टर्म स्वीकारण्यास फीट आहेत का याबाबत विचार करण्यास त्यांना आता मजबुर केले आहे. प्रचारसभेत बोलताना बायडेन म्हणाले की यंदाच्या निवडणुकीत अमेरिकेचे स्वातंत्र्य, लोकशाही आणि स्वत: अमेरिका पणाला लागली आहे.
डोनाल्ड ट्रम्प सूडाच्या भावनेने पछाडलेले आहे मात्र वास्तव हे आहे की सूडामुळे कोणती गोष्ट मोठी होऊ शकत नाही. ट्रम्प हेच आपल्या देशासाठी मुख्य धोका आहेत. मी पूर्वीसारखे चालू, वागू बोलू शकणार नाही. मात्र सत्य कसे मांडायचे याची मला पूर्ण कल्पना आहे.





