Congress : “मी खाईन आणि इतरांनाही खायला घालेन….”; काँग्रेसचा PM मोदींवर जोरदार प्रहार, भ्रष्टाचाराबाबत केले गंभीर आरोप
मोदींच्या ना खाऊंगा, ना खाने दूंगा या वचनाला फसवणूक म्हटले आणि आरोप केला की मोदींच्या सरकारने किमान प्रशासन, जास्तीत जास्त लपवाछपवी हेच धोरण राबवले आहे.

Congress | PM Modi – काँग्रेसने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. त्यांनी मोदींच्या ना खाऊंगा, ना खाने दूंगा या वचनाला फसवणूक म्हटले आणि आरोप केला की मोदींच्या सरकारने किमान प्रशासन, जास्तीत जास्त लपवाछपवी हेच धोरण राबवले आहे.
मोदींच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात मी खाईन, इतरांना खाऊ देईन आणि इतरांनाही खायला घालेन अशी स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी नमूद केले की, मे २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताना मोदींनी भ्रष्टाचारविरोधी घोषणेचा मोठा गाजावाजा केला होता.
रमेश म्हणाले की, मोदींचे भ्रष्टाचारविरोधी धोरण ही एक फसवणूक होती, हे लवकरच स्पष्ट झाले. दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटाबंदीचे वर्णन संघटित लूट आणि कायदेशीर दरोडा असे केले होते. ते किती सार्थ ठरले, हे नजिकच्या भविष्यकाळात समजलेच.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींच्या कार्यकाळात झालेल्या २०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यावर पांघरूण घालण्यासाठी गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे बळजबरीने ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये विलीनीकरण करण्यात आले. शिवाय इलेक्टोरल बाँड्सची (निवडणूक रोखे) सुरुवात हा ४ लाख कोटी रुपयांच्या प्रचंड मोठ्या देणगी द्या, व्यवसाय मिळवा घोटाळ्याचाच एक भाग होता.
आपल्या पोस्टमध्ये रमेश म्हणाले की, मोदानी (मोदी-अदानी) साम्राज्याची प्रचंड वाढ मोदी सरकारच्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन घडवते; काँग्रेसच्या हम अदानी के हैं कौन या मालिकेअंतर्गत पंतप्रधानांना विचारलेल्या १०० प्रश्नांतून हेच सिद्ध झाले आहे, असे रमेश म्हणाले.
असे आहे भ्रष्टाचाराचे चित्र :
१. राफेल कराराबाबत गंभीर प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नाही
२. पारदर्शकता नसलेला पीएम केअर्स फंड तयार केला
३. कॅगलासुद्ध कमकुवत करण्यात आले
४. आयुष्मान भारत, पीएम कौशल विकास योजनेत गैरव्यवहार
५. प्रतिष्ठेच्या अयोध्येतील राम मंदिरात देणगीचोरी
६. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू गैरव्यहारानंतरही पदावरच
७. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव जमीन घोटाळ्यानंतरही पदावरच
८. पर्यावरण मंत्र्यांचे सहकारी भ्रष्टाचारावरुन निलंबित; मंत्री सुखरुप
९. रस्ते वाहतूक मंत्रीनितीन गडकरी इथेनॉल मिश्रित इंधनामुळे अडचणीत
१०. पेपरफुटीबद्दल धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा प्रतिक्षेत
११. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांचे संशयाप्सद व्यवहार






