Lalit Modi : ‘मी छापा टाकेन’,’असं करायची हिंमत करू नकोस’, शशी थरूर यांचा तो फोन, ललित मोदींचा 16 वर्षांनंतर मोठा खुलासा
Lalit Modi : सुनंदा पुष्कर यांच्याबाबत चौकशी करू नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला आहे.

Lalit Modi : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी २०१० मधील गाजलेल्या कोची आयपीएल फ्रँचायझी वादावर पुन्हा एकदा भाष्य करत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. एका मुलाखतीत बोलताना ललित मोदी यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुनंदा पुष्कर यांच्याबाबत चौकशी करू नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला आहे.
ललित मोदी यांच्या म्हणण्यानुसार, कोची आयपीएल संघाच्या मालकी आणि भागीदारी रचनेबाबत त्यांना सुरुवातीपासूनच शंका होती. कन्सोर्टियममधील सर्व भागधारकांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, बैठकीदरम्यान सुनंदा पुष्कर अनुपस्थित असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाला होता असा दावा ललित मोदी यांनी केला आहे.
ललित मोदी यांचा खळबळजनक दावा
ललित मोदी म्हणाले की, “सुनंदा पुष्कर यांना २५ टक्के हिस्सा का देण्यात आला आहे, त्या नेमक्या कोण आहेत, याबाबत मी विचारणा केली. त्यानंतर लगेचच मला शशी थरूर यांचा फोन आला. त्यांनी सुनंदा पुष्कर यांच्याबद्दल प्रश्न विचारू नये, असा सल्ला दिला. तसेच, चौकशी केल्यास माझ्या घरावर छापा टाकला जाईल, अशी धमकीही दिली.” असा खळबळजनक दावा ललित मोदी यांनी केला आहे.
या प्रकरणात करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मोठा दबाव आणण्यात आला होता. त्यांना काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांचे फोन येत होते. तसेच, बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शशांक मनोहर यांनीही करारावर तत्काळ स्वाक्षरी करण्यास सांगितल्याचा दावा त्यांनी केला.
“मी दबावाखाली करारावर स्वाक्षरी केली, मात्र त्याची नोंदही केली. दुसऱ्याच दिवशी सकाळी सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांच्या नात्याबाबतच्या बातम्या झळकत होत्या. तेव्हा मला या संपूर्ण घाईमागचे कारण समजले,” असे मोदी यांनी म्हटले.
दरम्यान, ललित मोदी यांच्या या नव्या दाव्यांमुळे तब्बल १६ वर्षांपूर्वीचा कोची आयपीएल वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र, या आरोपांवर शशी थरूर किंवा संबंधितांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
नेमका काय दावा ललित मोदींनी केला आहे?
ललित मोदी यांनी केलेल्या दाव्यानुसार, एक बैठक बंगळूरमध्ये झाली होती. सुनंदा पुष्कर या एका महिलेला सोडून बाकी सर्व भागधारक उपस्थित होते. मी तो करार पाहत होतो, आणि तसं बघायला गेलं तर, ती कोण आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. मी कन्सोर्टियमच्या सदस्यांना विचारलं, ‘तुम्ही सुनंदा पुष्कर नावाच्या महिलेला २५% शेअर्स का देत आहात?’ ‘ती कोण आहे?’… मी म्हणालो, ‘जोपर्यंत…’ ‘सुनंदा पुष्कर कोण आहे, हे मी शोधून काढतो.’ मी असं म्हटल्याबरोबरच मला शशी थरूर यांचा फोन आला.
ते म्हणाले, ‘ललित, सुनंदा पुष्करबद्दल विचारू नकोस.’ ते माझे चांगले मित्र होते. ते म्हणाले, ‘जर तू विचारलंस, तर मी आज सकाळी तुझ्या घरावर छापा टाकायला लावीन.’ मी म्हणालो, ‘तुम्ही स्वतःला कोण समजता? तुम्ही भारताचे परराष्ट्र मंत्री असाल, पण पुन्हा माझ्याशी असं बोलायची हिंमत करू नका.’ मी फोन जोरात खाली ठेवला आणि म्हणालो, ‘मी यावर सही करणार नाही.’
त्यानंतर मला कळालं की…
मग एकच गोंधळ उडाला. पहाटेचे दोन वाजले होते. मग मला एक फोन आला. तुम्ही याची पुष्टी करू शकता. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांचा. जे सहसा कधीच हस्तक्षेप करत नसत. खूप चांगला माणूस. ते म्हणाले, ‘ललित, तुला या करारावर आजच सही करावी लागेल.’ आता, मी कधीही कोणत्याही अधिकाराचा अवमान करत नाही. मी त्यांना सांगितले की मी दबावाखाली या करारावर सही करेन, आणि मी हे स्पष्टपणे सांगेन की अध्यक्ष मला या करारावर सही करण्यास भाग पाडत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो, तेव्हा प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर तीच बातमी होती, ‘सुनंदा पुष्कर शशी थरूर यांच्याशी लग्न करत आहे.’ आता मला कळले की मला त्यावर सही का करावी लागली.
हेही वाचा : Rahul Gandhi : ‘वर्षभरात मोदी सरकार पडणार’; राहुल गांधींचा मोठा दावा, ‘हा’ इशारा देत म्हणाले…






