TOP 10 NEWS : अमेरिकेकडून युद्धविरामची घोषणा ते टीम इंडियाच्या नव्या कर्णधारपदी ‘या’ नावांची चर्चा…; वाचा टॉप 10 बातम्या
दिल्लीतील भीषण आगीच्या घटनेनंतर आता बिहारमधील मुझफ्फरपूर येथील प्रसाद हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत १० लोकांचा मृत्यू झाला आहे.

TOP 10 NEWS :
1 – ७ सप्टेंबरपर्यंत स्ट्रेट ऑफ होर्मूज सर्वांसाठी खुला होऊ शकतो..; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट घोषणा
स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा कधी सुरू होणार? याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. इराणसोबत अणुकराराबाबत अमेरिकेची चर्चा सुरू असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “मला वाटते की येत्या ७ सप्टेंबरपर्यंत स्ट्रेट ऑफ होर्मूज सर्वांसाठी खुला होऊ शकतो,” असे मत व्यक्त केले आहे. मात्र, आता इराण-अमेरिका चर्चेतून काय निष्पन्न होते आणि स्ट्रेट ऑफ होर्मूज प्रत्यक्षात कधी सुरू होतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
2 – जगाला ज्याची प्रतिक्षा ती घोषणा झालीच.! अमेरिकेकडून युद्धविरामची घोषणा
अमेरिका, इस्त्रायल आणि लेबनान यांच्यातील चर्चेनंतर युद्धविरामावर सहमती झाल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर हा महत्त्वाचा करार झाल्याचे सांगितले जात आहे.
युद्धविराम करारानुसार दक्षिण लेबनानमध्ये विशेष सुरक्षा क्षेत्र तयार करण्यात येणार असून त्या भागाची जबाबदारी केवळ लेबनानी सैन्याकडे असेल. या क्षेत्रात हिजबुल्लाहच्या उपस्थितीला परवानगी दिली जाणार नाही. मध्यपूर्वेतील वाढता तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेचा हा मोठा राजनैतिक प्रयत्न मानला जात आहे.
3 – दिल्लीनंतर बिहारमध्ये आगीचे तांडव.! मुझफ्फरपूरच्या हॉस्पिटलमधील ICU ला भीषण आग, १० रुग्णांचा होरपळून मृत्यू
दिल्लीतील भीषण आगीच्या घटनेनंतर आता बिहारमधील मुझफ्फरपूर येथील प्रसाद हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत १० लोकांचा मृत्यू झाला आहे.
ही घटना आज सकाळी ३ वाजण्याच्या सुमारास झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि पाहता-पाहता ती भडकली. या दुर्घटनेत होरपळलेल्या सर्व रुग्णांना तातडीने इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
4 – राज्यात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; राज्यात मुसळधार पावसाचा इशारा !
मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आता संपत आली असून पुढील काही तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार असून दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्येही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली.
5 – धनुष्यबाणाची ताकद वाढली.! भाजपला मोठा धक्का; ‘उबाठा’ गटाचे उपजिल्हाप्रमुख शिंदेसेनेत दाखल
डोंबिवलीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याशिवाय योगेंद्र भोईर, हेमा मुंबरकर तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवबंधन बांधले आहे.
6 – कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन; 4 हजार 500 बसेस धावणार !
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने मोठी तयारी सुरू केली आहे. लाखो भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी तब्बल ४ हजार ५०० बस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्तेमार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी ४६ बाह्य वाहनतळांवरून विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गासाठी १,४८५ बस उपलब्ध असतील. गर्दीच्या काळात अतिरिक्त व्यवस्था म्हणून २९० बस राखीव ठेवण्यात येणार आहेत. तर, रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठीही स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी १,५०० बसचे नियोजन करण्यात आले आहे.
7 – विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस; बंडखोरांना थंड करण्याचे महायुतीपुढे आव्हान
आगामी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज (दि. 6) शेवटचा दिवस आहे. महायुतीमध्ये भाजप 11 जागा, शिंदेंची शिवसेना 4 जागा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवत आहे.
तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 6 जागा, ठाकरेंची शिवसेना 4 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढवणार आहेत. त्यामुळे बंडखोरांना थंड करण्याचे आव्हान आज महायुतीपुढे आहे.
8 – लॅम्बोर्गिनी चा भारतात धमाका.! पहिली ‘टेमेरारियो’ हायब्रिड सुपर स्पोर्ट्स कार डिलिव्हर
लक्झरी स्पोर्ट्स कार निर्माता लॅम्बोर्गिनीने भारतात आपल्या नवीन टेमेरारियो सुपरकारची पहिली डिलिव्हरी पूर्ण केली आहे. तब्बल 6 कोटी रुपयांची ही हायब्रिड सुपरकार सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
ही कार लॅम्बोर्गिनीच्या हाय-परफॉर्मन्स इलेक्ट्रिफाइड व्हेईकल म्हणजेच HPEV रेंजमधील दुसरे मॉडेल आहे. टेमेरारियोमध्ये 920 पीएस पॉवर आणि 800 एनएम टॉर्क निर्माण करणारी दमदार हायब्रिड पॉवरट्रेन देण्यात आली आहे. त्यामुळे ही कार वेग, परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञानाचा जबरदस्त संगम मानली जात आहे.
9 – सूर्यकुमारनंतर टीम इंडियाचा नवा टी-20 कर्णधार कोण? ही पाच नावे चर्चेत !
भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी कर्णधारपदावरून हटवले असून, क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. मात्र आता नव्या कर्णधाराच्या शोधाला वेग आल्याची चर्चा आहे.
यामध्ये तिलक वर्मा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, इशान किशन आणि जसप्रीत बुमराह हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र, आता निवड समिती भारतीय संघाची धुरा कोणाकडे सोपवते, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
10 – ऐश्वर्या राय बनली JW Marriott ची पहिली ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर; सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद !
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने आपल्या कारकिर्दीत आणखी एक मोठा मानाचा टप्पा गाठला आहे. जगप्रसिद्ध लक्झरी हॉटेल ब्रँड JW Marriott ने ऐश्वर्याची पहिली ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.
ही आनंदाची बातमी ऐश्वर्याने सोशल मीडियावर शेअर केली. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या राय भारतीय चित्रपटसृष्टीसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.





