पुणे जिल्हा | मला मामा-भाच्याने फसवले -जगदाळे

इंदापूर (प्रतिनिधी) – माझं त्यांचं नातं मामा भाच्याचं आहे. आता यात कोण कोणाला फसवते, हे जनतेला चांगलं माहिती आहे. मला एका मामाने फसवले आणि एका भाच्याने असे नाव न घेता आजी-माजी आमदार यांच्यावर पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी टीका केली.
इंदापूर येथे आयोजित केलेल्या परिवर्तन मेळाव्यात मार्गदर्शन करताना जगदाळे बोलत होते. यावेळी सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन भरत शहा, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने,
नीरा भीमा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन कांतीलाल झगडे, बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे, विलास माने, वसंत मोहोळकर, बाजार समितीचे उपसभापती मनोहर डुके,
शकील सय्यद, किरण बोरा, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, दत्तात्रेय फरतडे, शिक्षणतज्ञ बाळासाहेब हरणावळ, यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
जगदाळे म्हणाले, इथलं मोहोळ महाराष्ट्रात उठणार आहे. इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही. या बंडखोरीचा आवाज सर्वसामान्य जनतेचा आहे.
कोणीही थांबू शकत नाही. इमानदारी व प्रामाणिकपणा आमच्यामध्ये आहे. त्यामुळेच नेता नसतानाही सुप्रिया सुळेंना 26 हजारांचे लीड दिले आणि म्हणताय अदृश्य शक्तीने येथे लीड दिले.
वारे पठ्ठ्या भाऊंच्या पुतळ्यासमोर खोटे बोलता. असा घणाघात विरोधकांचे नाव न घेता आप्पासाहेब जगदाळे यांनी केला.
प्रवीण माने यांनी इंदापूर तालुक्याचा चौफेर विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन जनतेसमोर मांडला. तालुक्याच्या सर्व घटकांचा विकास करण्यासाठी जनतेने परिवर्तन करावे. विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माघार घेणार नाही.
इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या माध्यमातून शहराचा कायापालट झाला आहे
त्यांचा आदर राखला गेला नाही म्हणून…
भरत शहा म्हणाले, इंदापूर तालुक्यात कै. शंकरराव पाटील, राजेंद्र कुमार घोलप असतील यांनी नीतिमत्तेचे राजकारण केले. कधीही निगेटिव्ह राजकारण केले नाही, खर्या अर्थाने यांनी विकासाची राजकारण केले हा विचार तालुक्यातील जनतेला हवा आहे.
आजी-माजी यांनी नकारात्मक राजकारण केले. उजनीच्या पाण्याचा प्रश्न, खडकवासल्याच्या पाण्याचा प्रश्न याचे राजकारण झाले. मजा बघितली, ज्यांनी मतं दिली होती. त्यांचा आदर राखला गेला नाही. म्हणून आपण परिवर्तन करण्यास सज्ज झालो आहे.





