Rahul Gandhi : “कॉंग्रेसने केलेल्या चुकांवेळी मी नव्हतो” – राहुल गांधी

नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाने आपल्या इतिहासात काही चुका केल्या. त्या बहुतांश चुकांवेळी मी कार्यरत नव्हतो. पण, प्रत्येक चुकीची जबाबदारी आनंदाने स्वीकारण्यास मी तयार आहे, असे परखड भाष्य कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.
काही दिवसांपूर्वी राहुल यांनी अमेरिका दौरा केला. त्यावेळी त्यांनी ब्राउन विद्यापीठाशी संबंधित संस्थेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एका शीख विद्यार्थ्याने त्यांना कॉंग्रेसचे शीख समुदायाशी असणारे संबंध आणि १९८४ यावर्षीच्या शीखविरोधी दंगलींशी निगडीत प्रश्न विचारला. त्यावर राहुल यांनी रोखठोक भूमिका मांडली.
मी याआधीच ८० च्या दशकात घडले ते चुकीचे असल्याचे सार्वजनिकरित्या म्हटले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मी अनेकदा सुवर्णमंदिराला भेट दिली आहे. शीख समुदायाशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत. त्या समुदायाशी माझे आपुलकीचे नाते आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
राहुल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भाजपच्या संकल्पनेला हिंदू संकल्पना मानत नसल्याचे नमूद केले. भारतात अनेक महान समाजसुधारक, विचारवंत होऊन गेले. त्यापैकी कुणीच धर्मांध नव्हते. सर्वांना समवेत घेऊन जाण्याचा संदेश त्यांनी दिला. सत्य, अहिंसा आदींवर त्यांचा भर होता.
भारत ज्यांना महान मानतो ते सर्वच आणि अगदी भगवान श्रीराम यांच्यासारखी पौराणिक व्यक्तिमत्वेही क्षमाशील, दयाळू होती. हिंदू संकल्पना सहिष्णू आणि स्नेहयुक्त आहे, असे ते म्हणाले. राहुल यांच्या संवादाचा व्हिडीओ संबंधित संस्थेने शनिवारी प्रसिद्ध केला.





