नसरापूरात स्मशानभूमी, बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ; नाम फाउंडेशनचा पुढाकार

नसरापूर, ता. भोर : नसरापूर ग्रामपंचायतीच्या विशेष पुढाकाराने आणि “नाम फाउंडेशन”च्या सहकार्याने स्मशानभूमी व बनेश्वर येथील बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ आज, गुरुवारी (दि. 22) सकाळी 10:30 वाजता करण्यात आला.
“नाम फाउंडेशन”तर्फे जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासासाठी राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात असून, नसरापूरमधील हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. या कामामुळे स्मशानभूमी परिसरात सौंदर्य आणि स्वच्छता वाढणार आहे. तसेच, नदीतील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमता वाढणार असून, नदीचा प्रवाह सुरळीत होईल. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता सुधारण्यात होणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल –
या उपक्रमाद्वारे नदीपात्रातील प्लास्टिक आणि घातक कचऱ्याची स्वच्छता केली जाणार आहे. यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नदीच्या स्वच्छतेमुळे गावातील पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल.
ग्रामस्थांचा उत्साह-
या शुभारंभ प्रसंगी सरपंच उषा विक्रम कदम, उपसरपंच नामदेव आत्माराम चव्हाण, सदस्य गणेश दळवी, इरफान मुलानी, माजी सदस्य बाबू झोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, पत्रकार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत नसरापूरच्या या पुढाकाराला प्रेरणादायी ठरवले.
प्रेरणादायी पाऊल –
नसरापूर गावाने उचललेले हे पाऊल इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. गावाचा हरवलेला निसर्गसन्मान पुन्हा प्राप्त करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक सकारात्मक टप्पा ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. “नाम फाउंडेशन” आणि ग्रामपंचायतीच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे नसरापूर गाव पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाच्या क्षेत्रात एक आदर्श निर्माण करत आहे.





