Paresh Rawal : “ब्लड प्रेशरच्या तीन गोळ्या खायला लागायच्या”; परेश रावल यांचा 12 वर्षांनंतर मोठा खुलासा
Paresh Rawal : २०१९ नंतर त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागचं कारण परेश रावल यांनी एका पॅाडकास्टमध्ये उघड केलं आहे.

Paresh Rawal : ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, अनेकांना कदाचित माहिती नसेल की, काही वर्षांपूर्वी ते सक्रिय राजकारणातही होते. २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर गुजरातमधील अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडून येत त्यांनी संसदेत प्रवेश केला होता. मात्र, २०१९ नंतर त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागचं कारण परेश रावल यांनी एका पॅाडकास्टमध्ये उघड केलं आहे.
अलीकडेच विकी लालवाणी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना परेश रावल यांनी राजकारण सोडण्यामागचं खरं कारण सांगत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, राजकारणात यशस्वी होण्यासाठी पूर्णवेळ समर्पण आवश्यक असतं आणि अभिनयासोबत हे दोन्ही सांभाळणं त्यांच्यासाठी शक्य नव्हतं.
आपला अनुभव सांगताना परेश रावल म्हणाले, “२०१४ मध्ये राजकारणात प्रवेश केल्यानंतर मला या क्षेत्राचं वास्तव समजलं. बाहेरून अनेकांना वाटतं की राजकारणी आरामात एसीमध्ये बसून काम करतात. पण प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. सततचा प्रवास, लोकांशी संवाद, बैठका आणि जबाबदाऱ्यांमुळे प्रचंड धावपळ करावी लागते.”
ते पुढे म्हणाले, “मला आधीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राजकारणात आल्यानंतर कामाचा ताण इतका वाढला की मला रक्तदाबासाठी तीन गोळ्या घ्याव्या लागत होत्या. हे काम खूप मेहनतीचं आहे आणि ते तुम्हाला अक्षरशः दमवून टाकतं.” असा खुलासा परेश रावल यांनी केला.
“मी तिथे कायमस्वरूपी जाण्यासाठी गेलो नव्हतो. काही काळासाठी हा अनुभव घ्यायचा होता. पण नंतर मला जाणवलं की हे माझं क्षेत्र नाही. राजकारण हे अत्यंत उदात्त काम आहे. त्यासाठी पूर्ण वेळ, पूर्ण समर्पण आणि सातत्य आवश्यक असतं. तेव्हाच त्या क्षेत्रात टिकून राहता येतं.” असेही परेश रावल म्हणाले.
सध्या परेश रावल यांनी राजकारणापासून पूर्णपणे दूर राहत पुन्हा अभिनयावर लक्ष केंद्रित केलं असून ते विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
Iran US Tensions: “होर्मुझ हिसकावण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही” ; इराणचा ट्रम्प यांना कडक संदेश





