‘देवाची शप्पथ सांगतो, मी भ्रष्टाचार केलाय तर, मिशाच काय भुवया देखील काढून टाकेन’ – उदयनराजे भोसले

सातारा – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात सध्या शहरातील विकासकामांवरून कलगीतुरा रंगला आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशात खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर शिवेंद्रराजे यांनी सातारा विकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या आरोपांवर आता प्रतिक्रिया देत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना थेट आव्हानच दिले आहे.
माध्यमांशी बोलतांना उदयनराजेंनी आव्हान दिले की,’तुम्ही दिवस वार आणि वेळ ठरवून समोरासमोर या. आम्ही कुठे भ्रष्टाचार केला हे दाखवा, एकाने जरी उदयनराजेंनी भ्रष्टाचार केला हे दाखवले तर मिशाच काय भुवया सुद्धा टाकेन, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आव्हान दिले. ते पुढे म्हणाले,'”आम्हाला नावे ठेवा मात्र तुम्ही सातारावासीयांसाठी काय केलं ते सांगा. मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या. अगदी वेळ, वार, ठिकाणही तुम्हीच ठरवा. एकाने जरी सांगितलं की उदयनराजेंनी भ्रष्टाचार केलाय तर मी देवाची शप्पथ सांगतो, मिशाच काय भुवया देखील काढून टाकेन, पुन्हा आपलं तोंड दाखविणार नाही”, असं थेट चॅलेंज उदयनराजे यांनी दिलं.
दरम्यान, खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात सध्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार टोलेबाजी रंगली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत उदयनराजेंची सातारा विकास आघाडी विरुद्ध शिवेंद्रसिंहराजेंची नगर विकास आघाडी आणि भाजप अशी लढत होणार हे निश्चित आहे.





