Umesh Patil : ‘दादांचा घातपात आहे असं मला वाटतं’; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, विलीनीकरणावर स्पष्टचं बोलले…
Umesh Patil : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ते बारामती येथे आले होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत अभिवादन केलं. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं.

Umesh Patil : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. त्यांच्या निधनाला अनेक महिने उलटले असले, तरी हा केवळ अपघात होता की त्यामागे काही घातपात होता, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
‘अजित पवारांचा घातपात आहे, असं मला वाटतं. एक दिवस याबाबत मी नक्की बोलणार,’ असं मोठं वक्तव्य उमेश पाटील यांनी केलं आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ते बारामती येथे आले होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत अभिवादन केलं. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम?
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरही उमेश पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माध्यमांमध्येच विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असल्याचं सांगत त्यांनी या चर्चांना फारसं महत्त्व नसल्याचं म्हटलं. सुनील तटकरे यांच्या वक्तव्यांबाबत बोलताना, त्यांची भूमिका आधीपेक्षा बदललेली दिसत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच, ‘मी जबाबदारीने सांगतो की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवारांशिवाय पहिलाच दिवाळी पाडवा; उमेश पाटील भावूक
यंदाचा दिवाळी पाडवा पवार कुटुंबीयांसाठी अत्यंत भावनिक ठरला. अजित पवार यांच्याशिवाय साजरा होणारा हा पहिलाच पाडवा असल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांमध्येही दुःखाचं वातावरण होतं. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी अजित पवार आणि शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून बारामतीत नागरिकांची गर्दी होत असे. मात्र, यंदा पवार कुटुंबाने दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी बोलताना उमेश पाटील भावूक झाले. ते म्हणाले, ‘दादांशिवाय पाडवा ही कल्पनाच पटत नाही. पाडव्याचा सण म्हणजे काटेवाडी आणि काटेवाडीला जाऊन दादांची भेट घेणं, हाच आमच्यासाठी पाडवा असायचा. राज्यभरातून असंख्य लोक साहेबांना आणि दादांना भेटण्यासाठी येत होते. दादांची उणीव कायमस्वरूपी जाणवत राहील. मागच्या शंभर वर्षांत आणि पुढच्या शंभर वर्षांतही असा नेता होणार नाही.’
तटकरे-रामदास कदम वादावरही भाष्य
सध्या सुनील तटकरे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी हा स्थानिक पातळीवरील संघर्ष असल्याचं म्हटलं.
रामदास कदम यांनी यापूर्वीही सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र, तटकरे हे गेल्या 40 वर्षांपासून कोकणात राजकीय काम करत असून, शिवसेनेच्या विरोधात पक्षाची पाळेमुळे रुजवण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे या वादाकडे स्थानिक राजकीय संघर्ष म्हणून पाहिलं पाहिजे, असं मत उमेश पाटील यांनी व्यक्त केलं.





