“मणिपूरच्या जनतेच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, लोकांनी शांतीच्या मार्गावर…”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

PM Modi in Manipur | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी हजारो कोटींच्या प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवला आहे. मणिपूरमधील अशांतता आणि जाळपोळीच्या घटनेनंतर पहिल्यांदाच मोदी येथे पोहचले आहेत. मणिपूर हिंसाचारानंतर विरोधकांकडून सातत्याने नरेंद्र मोदींनी मणिपूरला भेट द्यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मोदींनी घटनेच्या अनेक महिन्यांनंतर विकासकामांच्या निमित्ताने मणिपूरला भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “मणिपूर ही धरती हिमतीची आणि धैर्याची धरती आहे. या टेकड्या निसर्गाचा अनमोल ठेवा आहेत, आणि त्याचबरोबर या टेकड्या तुमच्या सर्वांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतीक आहेत. मी मणिपूरच्या लोकांच्या उत्साहाला सलाम करतो. इतक्या जोरदार पावसातही तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने येथे आला आहात, या तुमच्या प्रेमाबद्दल मी तुमचे आभार मानतो.”
2014 पासून राज्याच्या विकासाकडे लक्ष
पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, “मणिपूरच्या नावातच ‘मणी’ आहे, हा तो मणी आहे जो येत्या काळात संपूर्ण ईशान्य भारताची चमक वाढवणार आहे. भारत सरकारचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे की मणिपूरला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेले जावे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मी आज तुम्हा सर्वांसमोर येथे आलो आहे. काही वेळापूर्वी या व्यासपीठावरून सुमारे 7 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे शिलान्यास झाले आहे. हे प्रकल्प मणिपूरच्या लोकांचे, येथील टेकड्यांवर राहणाऱ्या आदिवासी समाजाचे जीवन आणखी सुधारतील.
2014 पासून मी या राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊन होतो. शहरांसह गावागावात रस्ते पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील होतो. आता, राज्यात 8768 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. विस्थापित झालेल्या कुटुंबांना पूर्ण मदत केली जाईल. भारत सरकार राज्य सरकारसोबत मिळून काम करेल.”
यानंतर पंतप्रधान मोदींनी मणिपूरला शांतीचा संदेश दिला. तसेच मणिपूरच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. लोकांनी शांतीच्या मार्गावर चालत आपली स्वप्ने पूर्ण करावीत, आपल्या मुलांच्या स्वप्नांना पूर्ण करावे, असे आवाहन देखील केले.
7,300 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमीपूजन
दरम्यान, प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते आज चुराचांदपूर येथे 7,300 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमीपूजन झाले आहे. त्यानंतर, मणिपूरसह मिझोराम, आसाम, प. बंगाल आणि बिहार या राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्यात भेट देणार आहेत.
राज्यातील मिझोराम येथून आयझोल-दिल्लीदरम्यान पहिल्या राजधानी एक्स्प्रेससह इतर नव्या रेल्वेना पंतप्रधान मोदींनी आज हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे, नॉर्थ इस्टमधील हे तीन राज्य आता थेट दिल्लीशी जोडले गेले आहेत. सायंकाळनंतर 14 सप्टेंबरपर्यंत मोदी आसाम दौऱ्यात भारतरत्न भूपेन हजारिका जन्मशताब्दी महोत्सवात सहभागी होतील.
त्यानंतर, प. बंगालमध्ये 15 सप्टेंबरला कोलकात्यात संयुक्त कमांडर संमेलनाचे उद्घाटन करतील आणि बिहारमधील पूर्णिया येथे राष्ट्रीय मखाना महामंडळाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते केले जाईल.
हेही वाचा:
चेहऱ्यावर सुज, हाताला पट्टी…; विकी जैन हॉस्पिटलमध्ये दाखल; अंकिता लोखंडे दिसली चिंतेत





