मला तर आता या कोरोनावरतीच संशय…; उबाठा गटाचे नेते वसंत मोरे असे का म्हणाले?

Vasant More: गेल्या तीन ते चार वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. याबाबत सर्वेाच्च न्यायालयाने राज्य सरकारला येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळतेच पूर्ण होतील, असे स्पष्ट केले आहे.
पण सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याचे काही नेते म्हणत आहेत. याबाबत पुण्यातील उबाठा गटाचे नेते वसंत मोरे यांनी निवडणुकीबाबत एक वेगळाच संशय उपस्थित केला आहे.
मला तर ना आता या कोरोनावरतीच संशय येऊ लागला आहे. कारण जेव्हा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महानगरपालिकेच्या) निवडणुकांची चर्चा चालू होते तेव्हा तेव्हा हा म्हणजेच कोरोना कुठून तरी बाहेर निघतो आणि मग निवडणूक आयोग म्हणतो आम्ही निवडणुका घेण्यास समर्थ नाही आणि निवडणुका पुढे जातात., अशी पोस्ट त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून शेअर केली आहे.
मला तर ना आता या कोरोनावरतीच संशय येऊ लागलाय…,
कारण जेव्हा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महानगरपालिकेच्या) निवडणुकांची चर्चा चालू होते तेव्हा तेव्हा हा म्हणजेच कोरोना कुठून तरी बाहेर निघतो आणि मग निवडणूक आयोग म्हणतो आम्ही निवडणुका घेण्यास समर्थ नाही pic.twitter.com/eEj5yRiatR
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) May 24, 2025
राज्यातील अनेक महापालिका, नगरपरिषदा जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुका गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित असून या ठिकाणी प्रशासनाद्वारे कामकाज चालू आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने देखील राज्य सरकारला चार महिन्यांमध्ये निवडणुका घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच निवडणुका आम्ही वेळतेच घेणार आहोत, असे स्पष्ट केले आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वाटते तिथील निवडणुका लांबू शकतात असे सांगितले आहे.





