Maratha Reservation : “मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार”; जरांगेंच्या आक्रमकतेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती

Maratha Reservation – राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून मराठा समाजाला आम्ही अन् मी स्वत: आरक्षण देणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
महायुतीच्या वतीने बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही जे बोलतो ते करतो. दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेचे अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते.
यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरक्षण दिले होते, पण ते आरक्षण कुणी घालवले, त्यांना आरक्षण कोर्टात टिकवता आले नाही. आता देखील आम्ही दिलेले आरक्षण रद्द करण्यासाठी याचिका दाखल होत आहेत. याचिका दाखल करणारे कोण आहेत, ते एकदा पहा, असे म्हणत शिंदेंनी विरोधकांवरही निशाणा साधला.
जरांगेंनी विचार करावा
जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पण महायुतीने मराठा समाजाला काय दिले, याबाबतही जरांगे यांनी विचार करावा. महायुतीने सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ तसेच ओबीसी समाजाप्रमाणे मराठ्यांना सवलती दिल्या आहेत.
आधी ज्यांच्या हातात सत्ता होती, त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. फक्त मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला, त्यामुळे मराठा समाजाला कोणी दिले आणि कोणी वंचित ठेवले, याचा जरांगे यांनी विचार करावा, असेही शिंदे म्हणाले.





