Uddhav Thackeray : “मेलो तरी चालेल, पण कधीही गुलामगिरी पत्करणार नाही..”; उद्धव ठाकरेंचा एल्गार.!
सत्तेसाठी गद्दारांची मदत घेऊन महाराष्ट्र गिळू पाहणाऱ्या दोन व्यापाऱ्यांसमोर मेलो तरी चालेल, पण कधीही गुलामगिरी पत्करणार नाही

Uddhav Thackeray – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवले. त्यांचा वारसा घेऊन लढताना अंगावर येणाऱ्या वादळांची आम्हाला भीती नाही. सत्तेसाठी गद्दारांची मदत घेऊन महाराष्ट्र गिळू पाहणाऱ्या दोन व्यापाऱ्यांसमोर मेलो तरी चालेल, पण कधीही गुलामगिरी पत्करणार नाही, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली.
मुंबईतील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सोहळा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मनसे नेते राज ठाकरेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. याप्रसंगी ठाकरे बंधुंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना स्वतःच्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागलेला आहे. जेव्हा शत्रूला विजय अशक्य वाटतो, तेव्हाच तो गद्दारांची मदत घेतो.
जर ही गद्दारी भगव्याशी झाली नसती, तर आज महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता. आज आपलेच काही लोक दोन व्यापाऱ्यांच्या हातातले बाहुले बनून महाराष्ट्रावर घाव घालत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी शिवसैनिकांचे कौतुक केले. मुंबईची लढाई तुम्ही अत्यंत जिद्दीने लढलात. त्यामुळेच ठाकरे आणि शिवसेना नाव पुसून टाकण्याचे कारस्थान रचणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.
मुंबईत निवडणुकीच्या काळात पैशांचा वारेमाप वापर झाला, बंद दाराखालून पाकिटे फेकली गेली. तुम्ही मते विकत घेऊ शकाल, पण लोकांची मने कधीच विकत घेऊ शकणार नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबईवरचा भगवा उतरवून तुम्हाला नक्की काय मिळाले, असा सवालही त्यांनी विचारला.
पक्षातील फुटीवर बोलताना त्यांनी पानगळीचे उदाहरण दिले. झाडाची जुनी आणि सडलेली पाने गळणे गरजेचे असते. कारण ती गळल्याशिवाय नवे कोंब फुटत नाहीत. गेलेली माणसे ही विकली गेलेली पाने आहेत, ज्यांच्यात आता जीव उरलेला नाही.
शिवसेवेला आता नवी पालवी फुटली असून नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे आणि आपण ही लढाई जिंकणारच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.






