Tanushree Dutta : मी एक मोठा धडा शिकले; तनुश्री दत्ताने शेअर केला धक्कादायक अनुभव, म्हणाली “एखाद्याला आदर देण्याऐवजी…”
Tanushree Dutta : यावेळी तिने बॉलिवूडमधील ज्येष्ठ कलाकार आणि इंडस्ट्रीतील काही प्रथांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

Tanushree Dutta : बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापासून काहीशी दूर असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे ती चर्चेत आली होती.
एका पोस्टमध्ये तिने दावा केला होता की, ९० वर्षीय साधूने तिच्या लग्नाबाबत भविष्यवाणी केली असून डिसेंबरमध्ये तिचे लग्न होईल आणि ती एका मुलाची आई बनेल. आता तनुश्री पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
यावेळी तिने बॉलिवूडमधील ज्येष्ठ कलाकार आणि इंडस्ट्रीतील काही प्रथांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. केवळ वयाने मोठे आहेत म्हणून एखाद्याचा आदर करणे योग्य आहे का, असा सवालही तिने उपस्थित केला आहे.
‘बॉलिवूडमध्ये ज्येष्ठ म्हणजे लबाड’
तनुश्रीने आपल्या पोस्टमध्ये, ‘पनौती’ म्हणजे अपशकुन किंवा दुर्दैव आणणारी व्यक्ती, असा अर्थ सांगत काही लोकांवर निशाणा साधला. चुकीच्या लोकांची संगत आणि त्यांना मिळणारा पाठिंबा यामुळे वाईट परिणाम होऊ शकतात, असेही तिने म्हटले.
View this post on Instagram
आपल्या अनुभवांचा दाखला देताना तनुश्रीने बॉलिवूडमधील ‘ज्येष्ठ’ या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिच्या म्हणण्यानुसार, केवळ वयस्कर असल्यामुळे एखाद्याला आदर देण्याऐवजी त्याचे चारित्र्य आणि वर्तन तपासले पाहिजे, असे तिने म्हटले आहे. तसेच बॉलिवूडमध्ये ज्येष्ठ म्हणजे लबाड असेही तिने म्हटले आहे.
“मी एक मोठा धडा शिकले.”
पोस्टमध्ये तनुश्री म्हणाली, काही वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ कलाकाराला मदत करण्याचा निर्णय तिच्यासाठी चुकीचा ठरला आणि त्याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला. पण तिने हे सांगताना नेमके काय घडले होते याविषयी सांगितलेले नाही. काही अनुभवी कलाकारांना मीडिया आणि जनतेला आपल्या बाजूने वळवण्याचे तंत्र चांगले अवगत असते. आपण या परिस्थितीत ‘बळीचा बकरा’ ठरल्याचेही तिने स्पष्ट केले. तसेच “मी एक मोठा धडा शिकले” असेही तिने नमूद केले. मात्र पोस्टमध्ये अभिनेत्रीने कोणाचेही नाव घेतलेले नाही. तनुश्रीने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने इंडस्ट्रीत काम करणाऱ्या नवोदित कलाकरांना सावध राहण्याचे सल्ला दिला असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.






