Santosh Pandit : ‘मी माझा हा अधिकार बजावत आलो आहे आणि…’; कारागृहातून बाहेर आल्यानंतर संतोष पंडित यांची पहिली प्रतिक्रिया समोर
Santosh Pandit : न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी येरवडा कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली.

Santosh Pandit’s first reaction after his release : पुण्यातील प्रसिद्ध यूट्यूबर संतोष पंडित यांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी येरवडा कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली.
१६ सप्टेंबर रोजी न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर संतोष पंडित यांना काही अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला. त्यानंतर कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
“जे काही झालं, तो मोठा धक्काच होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी जे काही करतोय, तो माझा संवैधानिक अधिकार आहे. मी माझा हा अधिकार बजावत आलो आहे आणि पुढेही बजावत राहणार.” असे संतोष पंडित यांनी म्हटले.
“मी थांबणार नाही. लोकशाहीत जनता देशाची मालक आहे. जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत. मी कोणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही. आपण ज्यांना निवडून देतो आणि जे लोक सत्तेत आहेत, त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. मग तो कोणताही प्रश्न असो.” असेही ते म्हणाले.
जामीन देताना न्यायालयाच्या अटी
जामीन मंजूर करताना न्यायालयाने संतोष पंडित यांच्यावर काही अटी घातल्या आहेत. त्यांनी फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये, तसेच या प्रकरणातील कोणत्याही पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
संतोष पंडित हे सोशल मीडियावर विविध विषयांवर व्हिडीओ पोस्ट करणारे प्रसिद्ध यूट्यूबर आहेत. पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांमध्ये असलेल्या त्रुटींबाबतही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ पोस्ट करत असतात.
काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि शिवराळ मजकूर असलेली व्हिडीओ क्लिप पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला होता. मंत्र्यांची जाहीर बदनामी केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन संशयितांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता.
फिर्यादीनुसार, संबंधित व्हिडीओमध्ये केवळ टीका करण्यात आलेली नसून शिवीगाळ आणि असभ्य भाषेचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संतोष पंडित यांना मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती.






