रामराजेंच्या शब्दावर विश्वास नाही : शंभूराज देसाई

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता माझी स्वीकृत संचालक होण्याची इच्छा नाही. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शब्दावर आता माझा विश्वास राहिला नसल्याचा टोला गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला. साताऱ्यात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी फलटण येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार ना. देसाई यांनी घेतला. ते म्हणाले, आ. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी फलटण येथील एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती.
ज्या पक्षाचे 18 खासदार निवडून आलेत, त्या पक्षाने दिल्लीची स्वप्ने पाहू नयेत. ठाकरे यांनी आता तरी घरातून बाहेर पडावे, अशी टीका पाटील यांनी केली होती; परंतु शिवसेनेचे आज 18 खासदार असले, तरी ते पक्षाच्या जिवावर निवडून आले आहेत. एकेकाळी भाजपचे केवळ दोन खासदार होते, हे पाटील यांनी विसरू नये. पाटील यांना राजकारणातले फारसे काही माहिती नाही. त्यामुळे त्यांनी केलेली टीका केवळ सत्ता नसल्याच्या नैराश्यातून आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने शिवसेनेचे बोट धरून भाजप महाराष्ट्राच्या मातीत वाढला. त्याबाबत माहिती हवी असल्यास पाटील यांनी भाजपच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांना एकदा विचारून घ्यावे.
दरम्यान, सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत ना. देसाई यांना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये घेण्याबाबत चर्चा होती; परंतु प्रत्यक्षात या पॅनेलमधून सत्यजित पाटणकर यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत ना. देसाई यांचा पराभव झाला होता. त्याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना छेडले. तुम्हाला आता “स्वीकृत म्हणून घेणार असल्याची चर्चा असून, त्याबाबत रामराजेंनी संपर्क केला आहे का? असे विचारले असता, रामराजेंच्या शब्दावर आता विश्वास राहिला नाही, अशी टीका ना. देसाई यांनी केली.





