मी कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही, पण..; मोदींनी पहिल्यांदाच स्वीकारला पुरस्कार

मुंबई – मास्टर दिनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या ‘लता दिनानाथ मंगेशकर’ पुरस्काराचं वितरण आज मुंबईत पार पडलं. पहिल्यांदाच हा पुरस्कार देण्यात येत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.
मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्काराचे पंतप्रधान मोदी पहिले मानकरी आहे. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुष्पगुच्छ, सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप होतं.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले की, मी सहसा कोणते पुरस्कार घेत नाही, पण जर पुरस्कार लतादीदींच्या नावानं आणि मंगेशकर कुटुंबियांकडून असेल तर इथे येणं माझं कर्तव्य आहे. मी लतादीदींच्या नावानं मिळालेला हा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित करतो.
या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योग मंत्री सुभाष देसाई व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांसह संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते.





