‘मी व्यस्त; प्रश्नावली पाठवा…’; केजरीवाल चौकशीसाठी तिसऱ्यांदा ईडीसमोर गैरहजर

Arvind Kejriwal – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल चौकशीसाठी तिसऱ्यांदा ईडीसमोर गैजहजर राहिले. समन्स बजावणाऱ्या ईडीला पुन्हा पत्र पाठवत केजरीवाल यांनी व्यस्त असल्याचे सांगितले. तसेच, प्रश्नावली पाठवल्यास उत्तरे देण्याची ग्वाहीही दिली.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित प्रकरणी ईडीला केजरीवाल यांची चौकशी करायची आहे. त्यासाठी ईडीने त्यांना याआधी दोनवेळा समन्स बजावले. मात्र, दोन्हीवेळा गैरहजर राहिल्याने ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावून त्यांना बुधवारी (३ जानेवारी) हजर राहण्यास सांगितले.
मात्र, आधीप्रमाणेच ईडीसमोर हजर राहण्याचे टाळत केजरीवाल यांनी त्या केंद्रीय यंत्रणेला पत्र पाठवले. आगामी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांची तयारी आणि दिल्लीतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या तीन जागासाठींच्या निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
याआधी मी पाठवलेल्या पत्रांना ईडीने प्रतिसाद दिला नाही. त्या पत्रांमध्ये मी चौकशीचा हेतू, स्वरूप आदींविषयी विचारणा केली होती. मात्र, ईडीने बाळगलेल्या मौनामुळे ती यंत्रणा अनावश्यक गुप्तता पाळत असल्याचे वाटते. संबंधित प्रकरणात ईडीची वर्तणूक मनमानी आणि अपारदर्शक वाटते, असेही केजरीवाल यांनी पत्रात म्हटले.
केजरीवाल यांनी याआधी ईडीला पाठवलेल्या पत्रांत समन्स अवैध आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला होता. संबंधित प्रकरणात याआधी मनीष सिसोदिया आणि संजय सिंह या आपच्या नेत्यांना अटक झाली.





