Sharad Pawar : ‘वसंतदादांचे सरकार मीच पाडलं’; शरद पवारांनी उलगडला जुन्या राजकारणाचा अध्याय

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात खळबळजनक कबुली दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पवारांनी 1978 च्या काळातील राजकारणाचा आणि आजच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.
शरद पवारांनी पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितले की, 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांचे सरकार आम्हीच घालवले. तसेच वसंतदादांच्या मोठ्या मनाच्या नेतृत्वाचाही गौरव शरद पवारांनी केला.
वसंतदादांचे सरकार पाडण्याची रणनीती
शरद पवार म्हणाले, “वसंतदादा हे इंदिरा काँग्रेसमध्ये होते, तर आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे स्वर्णसिंह काँग्रेसमध्ये होतो. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत होत्या, पण आम्हा तरुणांना याचा विरोध होता.
त्यामुळे आम्ही ठरवलं की वसंतदादांचे सरकार घालवायचे. आम्ही ते पाडलं आणि मी मुख्यमंत्री झालो.” 1978 मध्ये पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) स्थापन करून वसंतदादांचे सरकार पाडण्यात पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यामुळे त्यांच्यावर ‘वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला’ असा आरोपही झाला होता.
वसंतदादांचे मोठे मन
पवारांनी पुढे सांगितले की, दहा वर्षांनंतर परिस्थिती बदलली. काँग्रेस पुन्हा एकत्र आली तेव्हा वसंतदादांनी भूतकाळ विसरून पवारांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. “मुख्यमंत्री कोणाला करायचे, यावर चर्चा सुरू होती. अनेक नावे पुढे आली, पण वसंतदादांनी ठामपणे सांगितले की, पक्ष सावरण्यासाठी शरद पवारांकडेच नेतृत्व द्यायला हवे. ज्या व्यक्तीचे सरकार मी पाडले, त्यांनीच गांधी-नेहरूंचे विचार पुढे नेण्यासाठी मला पाठिंबा दिला. हे मोठ्या मनाचे नेतृत्व त्या काळात काँग्रेसमध्ये होते,” असे पवारांनी नमूद केले.
पूर्वी राजकारण मोठ्या मनाने केले जायचे
शरद पवारांनी आजच्या राजकारणावरही भाष्य केले. ते म्हणाले, “पूर्वी राजकारण मोठ्या मनाने केले जायचे. आता मात्र राज्यकर्त्यांकडूनच संसदेचे कामकाज ठप्प केले जाते. 14 दिवसांचे अधिवेशन चालू आहे, पण सातत्याने सभागृह तहकूब होते. हे संसदीय लोकशाहीला शोभत नाही.” त्यांनी दिल्लीत 300 खासदारांनी एकत्र येऊन शांततापूर्ण आंदोलन केल्याचा उल्लेख केला. “सत्ताधारी पक्ष महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असेल, तर आम्ही एकत्र येऊन आवाज उठवू. लोकशाही आणि संसदीय पद्धती टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
गांधी-नेहरूंच्या विचारांचा पुनरुच्चार
पवारांनी पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावरही टीका केली. “लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी देशाला दृष्टी देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी जवाहरलाल नेहरूंचे नाव घेतले नाही. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले, देश एकसंध ठेवला आणि भारताची जागतिक महती वाढवली, त्यांचे नाव न घेणे अस्वस्थ करणारे आहे,” असे पवार म्हणाले. त्यांनी गांधी-नेहरूंच्या विचारांना पुन्हा एकदा देशापुढे मांडण्याची आणि देशाचा चेहरा बदलण्याची गरज असल्याचे ठासून सांगितले.
महाराष्ट्राच्या नेतृत्वाची ताकद
वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण या नेत्यांनी महाराष्ट्रात नेतृत्वाची फळी उभी केली. त्यामुळे महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले गेले. त्यांनी दाखवलेली दृष्टी आणि ताकद यामुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. आज देशातील चित्र बदलले आहे. सत्तेचा गैरवापर आणि संसदेचे कामकाज ठप्प करणे हे लोकशाहीला धक्का देणारे आहे. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन गांधी-नेहरूंच्या विचारांवर आधारित देशाचा चेहरा पुन्हा घडवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असं आवाहन शरद पवार यांनी केले.





