“मी ब्राह्मण जातीचा, परमेश्वराचे मोठे उपकार…”; आरक्षणाच्या मुद्यावर नितीन गडकरी स्पष्टच बोलले

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो. एखादा माणूस हा जातीमुळे नाही तर त्याचे कर्तृत्त्व आणि अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो,’ असे विधान नागपूरमध्ये आयोजित केलेल्या हलबा महासंघाच्या कार्यक्रमात केले. एकीकडे राज्यात मराठा, ओबीसी, बंजारा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना गडकरी यांनी केलेले हे विधान लक्षवेधक ठरत आहे.
राज्यातील राजकीय आणि सामजिक वातावारण आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापल्याचं पाहायला मिळत आहे. याचदरम्यान नितीन गडकरी म्हणाले, “मी ब्राह्मण जातीचा आहे. आमच्यावर परमेश्वराने सगळ्यात मोठे उपकार केले असतील तर आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात ब्राह्मणांचं महत्त्व नाही, पण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खूप आहे. मी ज्यावेळेस तिकडं जातो. दुबे, त्रिपाठी, मिश्रा त्यांचं राज्य पॉवरफुल आहे. जसं आपल्याकडे मराठा जातीचं महत्त्व आहे तसं उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्त्वं आहे.”
“मी त्यांना सांगतो मी जातपात मानत नाही. कोणताही माणूस जात, धर्म आणि पंथामुळे मोठा होत नाही, तर तो गुणांमुळे मोठा होतो. गुणवत्तेचा विकास आहे त्यात समाजातील सुशिक्षितांनी दिशा दिली पाहिजे. समाजाला सुशिक्षित म्हणवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी तरुण मुलांना दिशा मिळवून द्यायला हवी,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. Nitin Gadkari |
‘समाजातील वरिष्ठांनी समाज सुधारणेसाठी प्रयत्न केले पाहिजे’
“आज बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. शैक्षणिक प्रगती, आर्थिक प्रगती बरोबर सामाजिक प्रगतीही महत्त्वाची आहे. समाजात पैसा आला, शिक्षण आलं. पण समाजाच्या तरुण मुलांवर संस्कार नसेल आणि हातभट्टी आणि दारु हे सुरु झालं ते मी एके काळी पाहिलं होतं. आता ती परिस्थिती नाही. हातमाग बंद झाला आणि हातभट्ट्या सुरु झाल्या होत्या. आता त्यादेखील बंद झाल्या. समाजातील वरिष्ठांची जबाबदारी आहे की त्यांनी समाज सुधारणेसाठी प्रयत्न केले पाहिजेत,” असे आवाहनही गडकरी यांनी केले.
हेही वाचा:





