चंद्रकांत पाटलांना मी हिमालयात सोडायला तयार – जयंत पाटील

सातारा : राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी ते जे काही बोलत आहेत, ते कुणाच्या हातचे बाहुले झाले आहेत, हे सर्वांना माहीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. तसेच भोंगे उतरविण्याबाबत राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केले आहे, त्यावर बोलताना ते म्हणाले की, भाजपशासित राज्यात भोंगे उतरविण्याबाबत काही कार्यवाही झाली आहे का? हे आधी राज ठाकरेंनी तपासावे आणि नंतर बोलावे, अशी टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
ते पुढे म्हणाले की, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर मी राजकारण सोडून हिमालयात जाईन, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपरोधिक टीका केली. दादांना मी हिमालयात सोडायला तयार आहे. पण ते जाणार नाहीत, कारण बोलेल तसे भाजपचे नेते वागत नाहीत, अशी टीका प्रदेशाध्यक्षांनी केली.
मी निवडणुकीला उभा राहिलो असतो तर विजयी झालो असतो, चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरमध्ये निवडणूक लढविण्याची संधी होती, मात्र ते उभे राहिले नाहीत, याचा अर्थ त्यांच्या म्हणण्यात फारसे तथ्य नाही, असाही टोला प्रदेशाध्यक्षांनी लगावला.




