मी धर्माचे प्रदर्शन करत नाही,आजवर…; नास्तिकपणाच्या आरोपाला पवारांचं सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई – मी धर्माचे प्रदर्शन करत नाही. मी आजवर 12 ते 14 वेळा निवडणुकीला उभा राहिलो. माझा प्रचाराचा पहिला नारळ कोणत्या मंदिरात फुटतो हे बारामतीमधल्या लोकांना जाऊन विचारा. पण त्याचा आम्ही कधी गाजावाजा करत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शरद पवार हे स्वत: नास्तिक असल्यामुळे त्याच दृष्टीकोनातून धर्माकडे पाहतात, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत केली होती. त्या टीकेला शरद पवार यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सविस्तरपणे प्रत्युत्तर दिले.
शरद पवार पुढे म्हणाले की, दुसरीकडे माझे काही आदर्श आहेत. त्यात प्रबोधनकार ठाकरेही आहेत. प्रबोधनकारांचे लिखाण जर तुम्ही वाचले तर यासंबंधीचे सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला होईल. प्रबोधनकारांनी देव-धर्माचा बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तीविरोधात प्रचंड टीका-टिप्पणी केली,असंही ते म्हणाले.
धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तींना ठोकून काढण्याचे काम त्यांनी केले. प्रबोधनकारांचे लिखाण आम्ही लोक वाचतो. पण सगळेच वाचतात असे नाही. बहुतेक त्यांच्याच कुटुंबातले लोक वाचत नसावेत, असे दिसते. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असा टोला देखील यावेळी शरद पवार यांनी राज ठाकरेंना लगावला.





