Ramraje Naik Nimbalkar । फलटण तालुक्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी रोखठोक शैलीत विरोधकांना चपराक लगावली आहे. कुरवली येथे झालेल्या बाणगंगा धरण पाणपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. “मी हार मानणारा माणूस नाही. माझ्या चुका मी जनतेसमोर मांडणार असून त्या दुरुस्त करण्यासाठी मैदानात उतरणार आहे,” असा ठाम संदेश रामराजे यांनी दिला आहे. “शून्यातून घडवलेले नेतृत्व विसरू नका!” रामराजे म्हणाले, “एक काळ होता, जेव्हा आमच्याकडे कुणीच नव्हते. त्या वेळी फलटणमधील लोक आणि कार्यकर्त्यांनी आम्हाला उचलून धरले. आज जर नवे नेतृत्व उदयास येत असेल, तर त्याचे परिणाम भविष्यात दिसतील. सध्याचे नेतृत्व तुमच्या पिढ्यांसाठी उपयोगी ठरणार नाही, हे लक्षात घ्या,” असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. “तुम्ही जे केलं त्याचा पाया आम्ही घातलाय” पुढे बोलताना म्हणाले, “आज आम्ही काही केलं नाही, असं म्हटलं जातं. पण आज जे काही घडलं आहे, त्याचा ९० टक्के पाया आम्ही रचलेला आहे,” असे म्हणत रामराजेंनी विरोधकांच्या दावा-प्रतिदाव्यांवर जोरदार प्रहार केला. “मी राजा आहे की नाही, माहिती नाही; पण मी लोकांचा सेवक आहे” “मी मीडियामध्ये कमी बोलतो, पण सगळं बघत असतो. मला केवळ सत्ता नको, मला संधी मिळाली की लोकांसाठी काम करायचं असतं, हे संस्कार माझ्या पिढ्यांपासून आहेत,” असंही रामराजे निंबाळकर यांनी यावेळी नमूद केले.