ह्युंदाई भारतात 2030 पर्यंत 45,000 कोटींची गुंतवणूक करणआर; 26 नवीन मॉडेल, इलेक्ट्रिक-हायब्रीडवर भर

मुंबई – दक्षिण कोरियाच्या ह्युंदाई मोटार कंपनीने भारतात 2030 पर्यंत 45 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या कालावधीत ही कंपनी भारतात 26 नव्या मॉडेलचे सादरीकरण करणार असून यामध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांचा जास्त समावेश असणार आहे.
ह्युंदाई मोटार या दक्षिण कोरियातील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोस मुनोझ यांनी सांगितले की, 2026 च्या तिसर्या तिमाहीत ह्युंदाई कॅपिटल ही कंपनी भारतीय बाजारात आपले काम सुरू करेल. त्यामुळे भारतीय ग्राहकांना कंपनीची वाहने विकत घेण्यासाठी मदत होईल. या कंपनीचे जेनेसिस नावाचे लक्झरी मॉडेल 2027 मध्ये भारतीय बाजारपेठेत सादर केले जाईल. विशेष म्हणजे या वाहनाची निर्मिती भारतीय प्रकल्पातच केली जाणार आहे.
2027 मध्ये भारतात विकसित केलेली इलेक्ट्रिक कार भारतात सादर केली जाणार आहे. मुनोझ यांनी सांगितले की, ह्युंदाई कंपनीच्या भारतात तयार झालेल्या एकूण उत्पादनापैकी 30 टक्के उत्पादने निर्यात करण्याचा कंपनीचा विचार आहे. दक्षिण कोरियानंतर भारत हे वाहन उत्पादनाचे कंपनीचे सर्वात मोठे दुसरे केंद्र असणार आहे. आगामी काळात ही कंपनी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर जास्त लक्ष देणार आहे. 2030 पर्यंत कंपनीचा महसूल दीड पटीने वाढून एक लाख कोटी प्रतिवर्ष होईल अशी कंपनीला अपेक्षा आहे.
ही कंपनी भारतात तीस वर्षापासून कार्यरत असून गेल्या वर्षी 45 हजार कोटी रुपयांच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनीची शेअर बाजारावर नोंदणी झाली आहे. 2008 मध्ये ही कंपनी विक्रीत आठव्या क्रमांकावर होती. 2022 मध्ये तिसर्या क्रमांकावर आली आहे. या कालावधीत अनेक कंपन्यांनी भारतातून अंग काढून घेतले. मात्र ह्युंदाई कंपनीने भारताबरोबर वाढण्याचे उद्दिष्ट ध्यानात घेऊन भारतात गुंतवणूक आणि काम वाढविले असल्याचे त्यांनी सांगितले.





