पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क आयुक्तालयाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल १३ किलो ७२५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (कॅनॅबिस) जप्त केला. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय अवैध बाजारमूल्य अंदाजे १३.७२ कोटी रुपये इतके आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. विशेष माहितीच्या आधारे एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी बँकॉकहून इंडिगोच्या उड्डाण क्रमांक 6E 1096 ने पुण्यात आलेल्या चार प्रवाशांची तपासणी केली. त्यांच्याकडील चेक-इन बॅगेजमध्ये तपासणीदरम्यान हिरवट-तपकिरी रंगाचे वाळलेल्या पानांसारखे पदार्थ आढळले. त्याचे वजन १३.७३२ किलो एवढे निघाले. प्राथमिक चाचणी अहवालात सदर पदार्थ हा गांजा (कॅनॅबिस) असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिन्ही प्रवासी तसेच एक हँडलर यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. संपूर्ण कारवाई अमली पदार्थ व मनोव्यापारिक औषधे कायदा अंतर्गत करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे सीमाशुल्क विभागाने सांगितले आहे.