#IPL2021 #RCBvSRH | हैदराबादचा बेंगळुरूवर रोमहर्षक विजय

अबुधाबी – एबी डिविलियर्सने अखेरच्या षटकात केलेल्या आक्रमक फलंदाजीनंतरही रॉयल चॅलेंजर बेंगळुरूला सनरायझर्स हैदराबादाकडून अवघ्या 4 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयाने हैदराबादच्या स्पर्धेतील स्थितीवर काहीही फरक पडला नसला तरी पहिल्या दोन क्रमांकात स्थान मिळवण्याच्या बेंगळुरूच्या आशा मात्र धुसर बनल्या आहेत.
विजयासाठी 142 धावांचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेल, देवदत्त पडिक्कल व डिविलियर्सच्या खेळीनंतरही बेंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला. पडिक्कलने 41 तर मॅक्सवेलने 40 धावांची खेळी केली. हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरला.
या अखेरच्या षटकांत बेंगळुरूला 13 धावांची गरज होती. या षटकात भुवनेश्वर कुमारने अत्यंत हुशारीने गोलंदाजी केली व संघाला 4 धावांनी निसटता विजय मिळवून दिला.
हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारसह सर्व पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा नवोदित वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याच्या भेदक गोलंदाजीसमोर सनरायझर्स हैदराबादचा डाव 20 षटकांत 7 बाद 141 धावांवर रोखला गेला. या सामन्यातील विजयासह स्पर्धेच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळवण्याची बेंगळुरूला संधी मिळाली आहे.
बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजी दिली. त्यांचा डाव सुरू झाल्यावर धावफलकावर 14 धावा असताना सलामीवीर अभिषेक शर्मा बाद झाला. त्यानंतर जेसन रॉय व कर्णधार केन विल्यमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली व संघाचा डाव सावरला.
विल्यमसन 29 चेंडूत 4 चौकारांसह 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर प्रियम गर्गही अपयशी ठरला. दुसरीकडे रॉयचाही संयम सुटला व अनावश्यक फटका मारून 44 धावांवर बाद झाला. त्याने 38 चेंडूत 5 चौकार फटकावले. त्यानंतर मात्र, जेसन होल्डर व वृद्धिमान साहा वगळता अन्य एकही फलंदाज बेंगळुरूच्या गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही. बेंगळुरूकडून हर्षल पटेलने 3 तर डॅनियल ख्रिस्तियनने 2 गडी बाद केले. जॉर्ज गार्टन व यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 7 बाद 141 धावा. (जेसन रॉय 44, केन विल्यमसन 31, जेसन होल्डर 16, प्रियम गर्ग 15, अभिषेक शर्मा 13, वृद्धिमान साहा 10, हर्षल पटेल 3-33, डॅनियल ख्रिस्तियन 2-14, यजुवेंद्र चहल 1-27, जॉर्ज गार्टन 1-29).
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 6 बाद 137 धावा. (देवदत्त पडिक्कल 41, ग्लेन मॅक्सवेल 40, एबी डिविलियर्स नाबाद 19, शाहबाज अहमद 14, उमरान मलिक 1-21, सिद्धार्थ कौल 1-24, भुवनेश्वर कुमार 1-25, जेसन होल्डर 1-27, रशिद खान 1-39).





